भाजपच्या महिला नेत्याच्या पतीची रेल्वेखाली आत्महत्या; सुसाईड नोटममध्ये भाजपच्या माजी आमदारावर गंभीर आरोप
मनतकर यांनी गुरुवारी दुपारी अजनी रेल्वे स्थानकावर फ्लॅट फॉर्मक्रमांक एकवर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यांच्याकडे मोबाईल किंवा कागदपत्रं नसल्याने त्यांची ओळख पटवणे कठिण झाले होते.
नागपूर : भाजपच्या नेत्या नयनाताई मनतकर यांचे पती अविनाश मनतकर यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या अजनी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. मनतकर यांच्या जवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये मनतकर यांनी आपल्या आत्महत्येला भाजपचेच माजी आमदार चैनसुख संचेती यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अविनाश मनतकर यांनी गुरुवारी दुपारी अजनी भागात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. यावेळी त्यांच्या मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात त्यांनी बुलढाण्यातील भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यावर या सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संचेती यांच्यामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचं मनतकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप
संचेती अध्यक्ष असलेल्या मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारात अध्यक्ष संचेती आणि उपाध्यक्ष लखाणी यांनी फसवल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. या सुसाईड नोटमध्ये रामदास पेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी किशोर शेळके यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
शेळके यांनी आपल्याकडून 38 लाख रुपये उकळले आणि मदतही केली नाही, असा आरोप या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कोर्टाच्या कामसााठी नागपुरात
मलकापूर अर्बन बँकेत घोटाळा झाला होता. त्याचे सर्व खापर अविनाश मनतकर आणि त्यांच्या पत्नी नयनाताई मनतकर यांच्यावर फोडण्यात आले होते. त्यामुळे मनतकर हे अस्वस्थ होते. आपला या घोटाळ्याशी काहीच संबंध नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं.
गुरुवारी मनतकर दाम्पत्य न्यायालयीन कामासाठी कोर्टात आले होते. कोर्टाचे काम आटोपल्यानंतर शेगावला जायचे सांगून ते दुपारी 3 वाजता नागपुरातून निघाले होते.
थोड्याच वेळात येतो म्हणून सांगून गेले…
थोड्याच वेळात येतो सांगून गेलेले मनतकर रात्री उशीर झाला तरी परतले नव्हते. त्यांच्याकडे मोबाईलही नव्हता. त्यामुळे मनतकर कुटुंबयी अस्वस्थ झाले होते. नातेवाईकांकडेही मनतकर यांची शोधाशोध करण्यात आली. त्यानंतर त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं.
ओळख पटवण्यात अडचणी
मनतकर यांनी गुरुवारी दुपारी अजनी रेल्वे स्थानकावर फ्लॅट फॉर्मक्रमांक एकवर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यांच्याकडे मोबाईल किंवा कागदपत्रं नसल्याने त्यांची ओळख पटवणे कठिण झाले होते. शेवटी रेल्वे पोलिसांनी त्यांची ओळख पटवली आणि मनतकर कुटुंबीयांना त्याची माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अविनाश मनतकर यांच्या पत्नी नयनाताई मनतकर या भाजपच्या प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा आहेत. मनतकर हे तेल्हारा वांगेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक होते. त्यांच्या मालकीचा पेट्रोलपंपही होता.