‘लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड’, भाजप आमदाराचं नागपुरात मोठं वक्तव्य
"अभी हम इतना बडा भानगड काय के लिए किया वह बताओ जरा. इमानदारी से बताओ. अंत:करण से. जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएँगी, तो मेरी ये लाडली बहना, कमल को वोट देंगी, इसके लिए तो हमने यह जुगाड किया", असं भाजप आमदार टेकचंद सावरकर आपल्या भाषणात म्हणाले.
“लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे”, असं वक्तव्य कामठीचे भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलं. या कार्यक्रमाचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वर शेअर करत भाजपचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका केली होती. “अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की, महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे”, असं विजय वडेट्टीवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यावर आमदार टेकचंद सावरकर यांनी खुलासा केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत टेकचंद सावरकर भाषण करताना दिसत आहेत. ते हिंदीत भाषण करत होते. “अभी हम इतना बडा भानगड काय के लिए किया वह बताओ जरा. इमानदारी से बताओ. अंत:करण से. जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएँगी, तो मेरी ये लाडली बहना, कमल को वोट देंगी, इसके लिए तो हमने यह जुगाड किया. यह सब सहीं बोलते हैं. सब झूट बोलते रहेंगे, मैं सही बोल रहा हुँ. नहीं तो बताने का यह और करने का वोह, हम क्या रामदेव बाबा के कार्यकर्ता हैं?”, असं भाजप आमदार टेकचंद सावरकर संबंधित व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.
अखेर महायुतीची भानगड पुढे आली!
महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे.
भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे. pic.twitter.com/EL6d0Jc6vW
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 24, 2024
टेकचंद सावरकर यांच्याकडून आपल्या व्हिडीओवर खुलासा
“मी हिंदीत भाषण देत होतो. भाषणाचा विपर्यास केला आहे. महिलांना एकत्र आणलं आहे. शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी जुगाड केला आहे. मतदानासाठी ही योजना आहे, असा अर्थ होत नाही. सुनील केदार यांनी ही योजना बंद करण्याचे वक्तव्य केलं आहे. काँग्रेस जवळ काहीच नाही म्हणून एडिट करून व्हिडीओ व्हायरल करत आहोत. मी मेळावे घेतले आहेत”, असा खुलासा टेकचंद सावरकर यांनी केला.
“सरकारवर याचा कुठलाही परिणाम होत नाही. विरोधकांचे कामच आहे, व्हिडीओ व्हायरल करणे, ही योजना जुमला आहे, असं विरोधक म्हणायचे. सरकारी योजना लोकांना लाभ देण्यासाठी असतात, याचा येणाऱ्या काळात फायदा होऊ शकतो”, असा दावा टेकचंद सावरकर यांनी केला.