Nagpur Butterfly Video : विदर्भातलं बोलणारं फुलपाखरू पाहिलंय? अॅपच्या माध्यमातून साधतंय संवाद
माणसांशी बोलणारं फुलपाखरू (Butterfly) आज आम्ही आपल्या भेटीला घेऊन आलोय. पाहू या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा(Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University)च्या प्राणीशास्त्र (Zoology) विभागातील हे बोलणारं फुलपाखरू.
नागपूर : माणसांशी बोलणारं फुलपाखरू (Butterfly) आज आम्ही आपल्या भेटीला घेऊन आलोय. हे फुलपाखरू तुम्हाला चक्क आपलं नाव सांगतं, आपल्या प्रजातीबद्दल आणि स्वत:बद्दल सर्व माहिती सांगतं. चक्क तुमचं नाव घेऊन तुमच्याशी संवाद साधतं. पाहू या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा(Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University)च्या प्राणीशास्त्र (Zoology) विभागातील हे बोलणारं फुलपाखरू… “हॅलो…. गजानन….. किटकांच्या जगात आपलं स्वागत आहे. मला आज तुला पाहून खूप आनंद झाला. माझं नाव डेलियास ल्युकेरीस आहे, मला सामान्यता हळदीकुंकू म्हणून ओळखलं जातं आणि मी कियेनेने कुटुंबातील आहे”…. हा आमच्या प्रतिनिधींशी एका डेलियास ल्युकेरीस या फुलपाखरनं साधलेला संवाद.
क्यूआर कोड स्कॅन करून करता येईल डाऊनलोड
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात या बोलणाऱ्या फुलपाखराचं ॲप लॅांच करण्यात आलंय. डॉ. सारंग ढोके यांनी हे ॲप तयार केलंय. विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीनं शिकता यावं, फुलपाखरांची माहिती कळावी, म्हणून डॅा. सारंग ढोके यांनी हे ॲप तयार केलंय. त्याची सुरुवात नागपूर विद्यापीठात करण्यात आलीय. क्यूआर कोड स्कॅन करून, ‘I am butterfly’ हे ॲप विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येतं.
उपक्रमाचं सर्वत्र कौतुक
या ॲपमध्ये 53 प्रकारच्या फुलपाखरांची माहिती संकलित करण्यात आलीय. सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना फुलपाखराची माहिती कळावी, म्हणून ‘I am butterfly’ अॅप तयार करण्यात आलंय. नागपूर विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागात 53 प्रकारच्या फुलपाखरांचा अभ्यास करण्यात आलाय. त्याची माहिती या ॲपमध्ये आहे. याच ॲपच्या मदतीनं चक्क फुलपाखरांनी आमच्याशी संवाद साधला… या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय.