इंडिया आघाडीला किती जागा मिळणार?; पहिल्यांदाच राजकीय नेत्याकडून मोठं भाकीत
सायरस पुनावाला यांनी शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. सायरस पूनावाला काय बोलले यापेक्षा शरद पवार यांचा तो निर्णय आहे. ते वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यावर मी काही बोलणं योग्य नाही.
नागपूर | 31 ऑगस्ट 2023 : इंडिया आघाडीची आज बैठक पार पडत आहेत. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. देशातील 28 पक्षांचे नेते आणि आजीमाजी मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत इंडिया आघाडीच्या निवडणूक रणनीतीवर चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यावर या आघाडीत एकमत झालं आहे. देशात भाजपला 200 जागांवरच रोखण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या प्रत्येक हालचालीकडे भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. भाजपच्या नेत्याने तर इंडिया आघाडीला किती जागा मिळणार याचं भाकीत करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
आतापर्यंत आलेल्या सर्व्हेतून इंडिया आघाडीला प्रचंड प्रमाणात जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यावेळी संसदेत विरोधकांची संख्या तुल्यबळ असणार असल्याचंही या सर्व्हेतून स्पष्ट झालेलं आहे. असं असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र पहिल्यांदाच मोठं भाष्य केलं आहे. इंडिया आघाडीला विरोधी पक्षनेता बनवता येईल एवढ्या जागाही मिळणार नाहीत, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर एकही विरोधी पक्षाचा नेता टिकू शकत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे लढाच
उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानचे डोहाळे लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनीच स्वत:साठी सर्व्हे केला आणि त्यांचंच नाव पुढे आलं. उद्धव ठाकरे बंगलोरला गेले होते. त्यांनी एखादी लोकसभा निवडणूक लढवून दाखवावीच, असं आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
मोदीच पुढचे पंतप्रधान
उद्धव ठाकरे कुठून लोकसभा लढणार? निवडण्याचा निर्णय झाला नाही. यांच्यात एकमत होणार नाही. ठिणगी पडेल. नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत. हे म्हणतात पंतप्रधान पदाचा उमेदवार नंतर ठरवू. हे जनतेला मान्य होणार नाही. काँग्रेसला विरोधीपक्ष नेता बनवता येणार नाही, असंही ते म्हणाले.
संयोजक झाले तरी काहीही…
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे संयोजक होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. कुणीही संयोजक झाल तरी काही होणार नाही. हे त्या डबक्यात कुदतील आणि त्या डब्यात राहतील. हे नेते देशव्यापी काहीच करू शकणार नाही. देशाला उंची देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. हे डब्यात राहणारे लोक आहेत. किंचित सेना, शिल्लक सेना, तीन साडेतीन जिल्ह्यात प्रभाव असणारे, काही कोकणापूरते मर्यादित असे नेते या बैठकीत आले आहेत. अशी टीकाही त्यांनी केली.