मराठा समाजाचं स्वप्न भंगणार? वडेट्टीवार यांच्या ‘त्या’ मागणीला विरोध; बावनकुळे आणि भुजबळ काय म्हणाले?
विरोधी पक्षाच्या हातात केलीत लागलंय. कोणी लाठीचार्ज केला याची चौकशी केली पाहिजे, असं सांगतानाच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधारी, विरोधक आणि मराठा समाजाने एकत्र आलं पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
गजानन उमाटे, टीव्ही 9 मराटी प्रतिनिधी, नागपूर | 4 सप्टेंबर 2023 : आरक्षणाची एकूण मर्यादा वाढवून किंवा ओबीसींच्या 27 कोट्याच्या आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. वडेट्टीवार यांनी थेट मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याची भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. वडेट्टीवार यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांची मागणी योग्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचं काय होणार? असा सवाल निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवर असहमती दर्शवली आहे. ओबीसींचं आरक्षण फक्त 17 टक्के उरलेलं आहे. 17 टक्क्यात 400 जाती आहेत. यामुळे सगळ्यांची अडचण होईल. भारत सरकारने 50 टक्क्याचा कॅप ओलांडून 10 टक्के ओपनला वाढवलेले आहे. आणखी दहा टक्के वाढवून त्यात मराठा समाजासह पटेल, जाट आदी समाजाला आरक्षण द्या. म्हणजे सगळ्यांचा प्रश्न मिटेल, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
पवार, ठाकरे, पटोलेंनी बोलावं
मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. 17 टक्क्यात 54 टक्के ओबीसी आणि मराठा समाज बसणार नाही. यामुळे कोणाच्याच वाट्याला काही येणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या सगळ्यांसह विरोधी पक्षाने देखील आपलं मत मांडलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
सर्वांना दिल्लीत जाऊन बसावं
ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा न येता, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कसा न्याय देता येईल हे बघितलं पाहिजे. सगळ्यांनी जाऊन दिल्लीत बसलं पाहिजे. हे सगळं सहज करता येणं शक्य आहे. नाहीतर या सगळ्या लढाया सुरुच राहणार आहेत. मोर्चे निघणार, आंदोलन होणार, परत तोंडाला पाण पुसली जाणार, असंही ते म्हणाले.
ती भूमिका अयोग्य
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वडेट्टीवार यांनी ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणे अयोग्य आहे. ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्या समाजाला देणं अयोग्य, परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
वडेट्टीवारजी तुम्ही नापास झालात
फडणवीस सरकारने जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कसं टिकवता येईल यासाठी सरकार पुढे प्रयत्न करत आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, समाजासमाजात भांडण लावणं योग्य नाही. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाची वडेट्टीवार यांची मागणी चुकीची आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवून देण्याच्या मागणीची केस सर्वोच्च न्यायालयात आहे. आमच्या सरकारच्या काळात फडणवीसांच्या नेतृत्वात सर्व मराठा नेते एकत्र आले आणि मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध केला. पण नंतर वडेट्टीवारजी तुम्ही त्यात नापास झालात, असा टोला त्यांनी लगावला.
शिंदेंनी प्रयत्न करावा
आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न सुरु केले पाहिजे. सगळ्या बाबी तपासून सर्वोच्च न्यायालयात जायला पाहिजे, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. तसेच विशेष अधिवेशन घेऊन वडेट्टीवार यांनी त्यांच्या काळात तोडगा का काढला नाही? आज का जाग आली? मराठा समाजाला आमचं सरकार न्याय देऊ शकते हे मराठा समाजाला माहीत आहे, असा दावाही त्यांनी केला.