370 कलम हटवलं… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; ठाकरे म्हणाले, आता पाक व्याप्त काश्मीर..
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटवलं होतं. केंद्र सरकारच्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे. केंद्र सरकारचा निर्णय योग्यच आहे. 370 कलम हटवण्यासाठी केंद्र सरकारने जी प्रक्रिया राबवली होती, ती योग्यच आहे, असं सांगतानाच जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
नागपूर | 11 डिसेंबर 2023 : केंद्र सरकारने 370 कलम रद्द केलं होतं. केंद्र सरकारच्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केलं आहे. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. युद्धाच्या कारणामुळे त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम लावण्यात आलं होतं. ती तात्पुरती तजवीज होती, असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे. कोर्टाच्या या निर्णयाचं सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोर्टाच्या निकालाचं स्वागत केलं आहे. मात्र, हे कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करताना केंद्र सरकारला कानपिचक्याही दिल्या आहेत. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालचं स्वागत केलं आहे.
उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला आले होते. यावेळी त्यांन मीडियाशी संवाद साधला. केंद्र सरकारने 2019मध्ये 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतला. त्याला आम्ही पाठिंबा दिला होता. आता या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं. आम्ही त्याचं स्वागत करतो. आम्ही समर्थन केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्याचं स्वागत करतो. सप्टेंबरपर्यंत निवडणुका झाल्या पाहिजे असं कोर्टाने म्हटलं. लोकांना मोकळ्या वातावरणात मतदान करता यायला पाहिजे. निवडणुकीपूर्वी पाकव्याप्त काश्मीर आपण मिळवायला हवा. संपूर्ण काश्मीरमध्ये एकत्रित निवडणुका झाल्या तर देशवासियांना आनंद होईल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
मोदी गॅरंटी देतील का?
सध्या गॅरंटीचा जमाना आहे. सध्या याची गॅरंटी द्या, त्याची गॅरंटी द्या ते चालू आहे. पंतप्रधान गॅरंटी देत आहेत. त्याला मोदी गॅरंटी म्हणतात. त्यामुळे काश्मीर पंडितांबद्दल गॅरंटी कोण घेणार? काश्मीर पंडित घर सोडून जबरदस्तीने पळून गेले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आश्रय दिला होता. ते परत येतील याची गॅरंटी कोण देईल? कोण आहे या देशात गॅरंटी देणारं? कोणता नेता आहे? येणाऱ्या निवडणुकीआधी पंडितांना घरी येण्याची गॅरंटी कोण देणार? पंतप्रधान त्याची गॅरंटी देणार का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ होत आहे. देशाची राजकीय एकात्मता राखणारे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलले होते, ते कोर्टाने आज वैध ठरवले आहे. त्याबद्दल मी मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करतो. जम्मू काश्मीर मधील दहशतवाद संपून ते देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तिथे आता मुक्त वातावरणात निवडणूक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मला एक दिवस पंतप्रधान करा, मी काश्मीरवर लादलेले कलम 370 रद्द करतो, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत. मोदींनी हिंमतीने तो निर्णय घेऊन बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली. काही विघ्नसंतोषी मंडळी काश्मीरला पुन्हा वेगळे पाडू इच्छितात. मात्र त्यांचे हे प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे सुतोवाच केंद्राने केले आहेच. तो प्रदेश भारतात सामील करुन घेण्याच्या दृष्टीनेही आता प्रयत्न होतील हे नक्की, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.