ठराव करणाऱ्या ‘त्या’ गावांमागे कोणता राजकीय पक्ष?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभेतील खळबळजनक दावा काय?
या बैठकीनंतर शहा मीडियासमोर आले. मीडियासमोर त्यांनी बैठकीची माहिती दिली. शहा यांनी सीमाप्रश्नावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्याचं अभिनंदन करायला हवं होतं.
नागपूर: आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात सीमावादाचा प्रश्न चांगलाच गाजला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करताना कानडी अरेरावीवर बोट ठेवलं. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत काय झालं त्याची माहिती पटलावर ठेवण्याची मागणी केली. तसेच कर्नाटकाची मुजोरी सुरू असताना राज्य सरकारने घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेवरही बोट ठेवलं. अजित पवार यांच्या या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमकपणे उत्तर दिलं. यावेळी त्यांनी अजितदादांचे आरोप खोडून काढतानाच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार हल्ला चढवला.
सीमावासीय ठराव करत आहेत. कर्नाटकात जाण्याचे हे ठराव आहेत. त्यामागे कोणते पक्ष आहेत याची माहिती आम्हाला पोलिसांकडून आली आहे, असा खळबळजनक दावा करतानाच जे इतक्या वर्षात झालं नाही ते आम्ही करून दाखवलं.
48 गावांची 2000 कोटींची योजना कालच मंजूर केली. अडीच वर्षात तुम्ही सीमावासीयांच्या योजना बंद केल्या. त्यांचं अनुदान बंद केलं. तुम्ही काय सांगता सीमावासियांबद्दल? असा संतप्त सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. शिंदे यांच्या दाव्यानंतर सीमावर्ती गावांना कर्नाटकात जाण्यासाठी ठराव करायला लावणारा राजकीय पक्ष कोणता? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
विरोधी पक्षनेत्याने सीमावादाचा मांडलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. मी आणि देवेंद फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे गेलो होतो. पहिल्यांदाच या प्रश्नावर देशाच्या गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. मध्यस्थी केली. हे पहिल्यांदा घडलं. त्याबद्दल तुम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांचं अभिनंदन करायला हवं होतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा असल्याचं आम्ही अमित शहा यांना सांगितलं. आम्ही महाराष्ट्राची ठोस बाजू घेतली. महाराष्ट्राच्या गाड्या अडवल्या जातात, जाळपोळ होते. त्यामुळे असा प्रकार होऊ नये अॅक्शनला रिअॅक्शन होऊ शकते असं आम्ही गृहमंत्र्यांना सांगितलं.
त्यावर गृहमंत्र्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना तंबी दिली. अशा प्रकारचं काही प्रकरण होऊ नये. दोन्हीकडच्या लोकांना त्रास होऊ नये, असं त्यांनी बजावल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
या बैठकीनंतर शहा मीडियासमोर आले. मीडियासमोर त्यांनी बैठकीची माहिती दिली. शहा यांनी सीमाप्रश्नावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्याचं अभिनंदन करायला हवं होतं. यापूर्वी कोणती सरकारं महाराष्ट्र आणि कर्नाटकात होती हे सर्वांना माहीत आहे.
कोणत्या सरकारने परवानगी दिली याची माहिती घ्या. यात राजकारण करू नका. आम्ही राजकारण करत नाही. राजकारण करायला विषय आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना खडसावलं.