Nagpur fines भीती ओमिक्रॉनची, तरीही विनामास्क वावर, 42 हजार 67 जणांकडून दंड वसूल
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार 28 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 14 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
नागपूर : ओमिक्रॉन हा कोरोनाचा विषाणू राज्यात धडकला. तरीही काही नागरिक गांभीर्यानं घेताना दिसून येत नाहीत. त्यामुळं विनामास्क वावर करणाऱ्यांकडून मनपा अजूनही दंड वसूल करीत आहे. मागील काही महिन्यात शोध पथकांनी 42 हजार 67 नागरिकांविरुध्द कारवाई केली. आतापर्यंत 1 कोटी 93 लाख 92 हजार 500 रुपयांचा दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात आलाय.
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार 28 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 14 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
बाजारपेठेत विनामास्क वावर
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अद्यापही टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर विनामास्क नागरिक बाजारपेठेत फिरताना दिसतात. ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे. शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 1, धरमपेठ झोन अंतर्गत 8, हनुमाननगर झोन अंतर्गत 6, गांधीबाग झोन अंतर्गत 4, सतरंजीपुरा झोन अंतर्गत 2, आशीनगर झोन अंतर्गत 6 आणि मंगळवारी झोन अंतर्गत 1 जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
मास्क लावा, सुरक्षित राहा
नागपुरात रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहाही झोनमधील मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इत्यादीची सूचना नागपूर मनपाव्दारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
5 प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने 41 प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली. लसीचे डोज घेणाऱ्यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.