Nagpur Omicron | ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली, दुसरा ओमिक्रॉनबाधित सापडला; प्रशासन अलर्ट झोनमध्ये
बाधित युवक महापालिकेच्या धंतोली झोनअंतर्गत येणार्या नरेंद्रनगर येथील रहिवासी असल्याचे मनपाकडून सांगण्यात येते. हा रुग्ण गेल्या शनिवारी (ता. 18) दुबईवरून विमानाने दिल्लीला पोहोचला. त्यानंतर तो दिल्लीमार्गे नागपूर येथे विमानाने आला.
नागपूर : नागपुरात ओमिक्रॉन (Nagpur Omicron) विषाणूच्या दुसऱ्या रुग्णाची नोंद गुरुवारी झाली. 21 वर्षीय युवक दुबईवरून शहरात परतला होता. जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये त्याचा अहवाल सकारात्मक आला आहे. सध्या त्याच्यावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या रुग्णाला कुठलेही अशी लक्षणे नसल्याचे सांगण्यात येते. तरीही प्रशासन अलर्ट झोनमध्ये आले आहे.
दुबईवरून आला बाधित प्रवासी
बाधित युवक महापालिकेच्या धंतोली झोनअंतर्गत येणार्या नरेंद्रनगर येथील रहिवासी असल्याचे मनपाकडून सांगण्यात येते. हा रुग्ण गेल्या शनिवारी (ता. 18) दुबईवरून विमानाने दिल्लीला पोहोचला. त्यानंतर तो दिल्लीमार्गे नागपूर येथे विमानाने आला. विदेशातील प्रवासाची पार्श्वभूमी असल्यामुळे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची कोविडची चाचणी करण्यात आली. त्यात त्याचा अहवाल कोविड सकारात्मक आढळून आला. त्याला त्वरित एम्स हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले.
बाधित युवकाला नाहीत कुठलीही लक्षणे
दुबईवरून आल्यानं ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता या युवकाचा एक नमुना (स्वॅब) १९ डिसेंबर रोजी जिनोम सिक्वेन्सिंगकरिता पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. गुरुवारी (ता. 23) त्याचा अहवाल पुण्याचा प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला. युवकाला ओमिक्रॉनची बाधा झाल्याचं स्पष्ट झालंय. मात्र, या बाधित रुग्णाला कुठलीही लक्षणे नाहीत. तर पूर्व आफ्रिकेतून बुधवारी (ता. 22) नागपुरात पोहोचलेल्या महापालिकेच्या गांधीबाग झोनअंतर्गत वास्तव्यास असलेल्या व सध्या एम्समध्ये भरती 21 वर्षीय कोरोनाबाधित तरुणाची दुसर्यांना आरटीपीसीआर चाचणी केली. त्यातही तो बाधित आढळून आला. त्यामुळं त्याचाही नमुना गुरुवारी जिनोम सिक्वेन्सिंगकरिता पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल पुढील आठवड्यापर्यंत येणे अपेक्षित आहेत. त्यानंतरच त्याला नव्या व्हेरियंट ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे किंवा नाही, हे स्पष्ट होईल.
कोविड प्रोटोकॉलचे पालन करा
ख्रिसमस व ३१ डिसेंबरच्या स्वागतसाठी सारेच सज्ज झाले होते. पण, दुसरा ओमिक्रॉनबाधित सापडल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन होईल, यासाठी जिल्हा प्रशासन, मनपा आणि पोलीस विभागानं दक्ष राहावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या आहेत.