तीन दिवस सभागृहात सत्ताधारी-विरोधक यांच्यात हल्लकल्लोळ, …आणि रात्री एकाच सोफ्यावर भाजप आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
तीन दिवसांत सभागृहात इतका गोंधळ उडाल्यानंतर नागपुरात आज रात्री एका कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांचं एकाच मंचावर मनोमिलन होताना दिसलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.
स्वप्निल उमप, नागपूर : महाराष्ट्राचं विधीमंडळाचं गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरुय. या तीन दिवसांत विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर सत्ताधाऱ्यांनी आज दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी लावणार असल्याचं घोषित करत विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे तीन दिवसांत सभागृहात इतका गोंधळ उडाल्यानंतर नागपुरात आज रात्री एका कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांचं एकाच मंचावर मनोमिलन होताना दिसलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गझल सम्राट भीमराव पांचाळे यांच्या ‘गझलसंध्या’ कार्यक्रमानिमित्ताने भाजप, काँग्रेस आणि शिंदे गटाचे नेते आज एकत्र आले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज एकाच सोफ्यावर बसलेले बघायला मिळाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
विशेष म्हणजे यावेळी राजकारणापलिकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या गझलीच्या निमित्ताने जोरदार गप्पा रंगल्या.
या गझल कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही हजेरी होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार आशिष शेलार यांनी या गझल कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
राज्य सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार
विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. पण त्या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार टाकला होता.
त्यानंतर सोमवार ते बुधवार अधिवेशनादरम्यान सभागृतात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन चांगलाच कलगीतुरा रंगलेला बघायला मिळाला. नाना पटोले तर चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले होते. पण त्यानंतर आजच्या गझलच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावलेली बघायला मिळाली.