‘अबला नाही, सबला आहे, दुर्गेचं रूप घेईन’, उमेदवारी रद्द होताच रश्मी बर्वे कडाडल्या
"मला माझ्या वकीलाशी सल्ला करायला सुद्धा वेळ मिळणार नाही अशा पद्धतीने नोटीस देण्यात आली. मी अबला नाही सबला आहे. मी दुर्गेचं रूप घेईन. सरकारला लाज वाटायला पाहिजे एका अनुसूचित जातीच्या महिलेची जातवैधता एका तासात अवैध ठरवते", अशा शब्दांत रश्मी बर्वे यांनी आपला संताप व्यक्त केला.
काँग्रेसला रामटेक लोकसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. कारण निवडणूक आयोगाने रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द केली आहे. रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र आज सकाळी रद्द झाल्याची माहिती समोर आली होती. रश्मी बर्वे यांच्या जातप्रमाणपत्र वैध नसल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. या प्रकरणी जात पडताळणी समितीने तपास केला. या तपासाअंती जात पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवलं. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून आज उमेदवारांच्या अर्ज छाननीत रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर रश्मी बर्वे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
“दिवसभराच्या घटनाक्रमात सत्तेत हुकूमशाही राजवट आहे आणि या नेत्यांनी माज आणला तो स्पष्ट झालं आहे. माझ्यासारख्या अनुसूचित जातीच्या महिलेला हे घाबरले. मला माझ्या वकीलाशी सल्ला करायला सुद्धा वेळ मिळणार नाही अशा पद्धतीने नोटीस देण्यात आली. मी अबला नाही सबला आहे. मी दुर्गेचं रूप घेईन. सरकारला लाज वाटायला पाहिजे एका अनुसूचित जातीच्या महिलेची जातवैधता एका तासात अवैध ठरवते”, अशा शब्दांत रश्मी बर्वे यांनी आपला संताप व्यक्त केला.
‘आम्ही गरीब असलो तरी शक्ती कमी नाही’
“आम्ही सकाळपासून झटत आहोत. सरकारला भीती वाटली. सरकार महिलेला घाबरली आहे. माझे कार्यकर्ते, नेते माझ्या पाठीशी आहेत. मी ताकदीने उभी राहीन. आम्ही गरीब असलो तरी शक्ती कमी नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागणार. माझा तर फॉर्म बाद ठरविला आहे. मात्र माझ्या पतीच्या बी फार्ममध्ये सुद्धा अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. मी जिल्हा परिषद अध्यक्ष होती तेव्हा यांनी का आक्षेप घेतला नाही? आज माझ्यावर अन्याय केला. उद्या आणखी कोणावर करतील. निवडणूक आयोगाने आता माझे पती शामसुंदर बर्वे यांची उमेदवारी निश्चित केली. माझी जात कोणती हे आता विरोधकांनी सांगावं”, असं चॅलेंज रश्मी बर्वे यांनी विरोधकांना दिलं.
रामटेकमधून काँग्रेसचा उमेदवार आता कोण?
रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्यानंतर आता रामटेकमधून काँग्रेसचा उमेदवार कोण असेल? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. रश्मी बर्वे यांनी एबी फॉर्ममध्ये त्यांचे पती शामसुंदर बर्वे यांचं नाव दिलं होतं. शामसुंदर बर्वे यांनीदेखील फॉर्म भरला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने रश्मी बर्वे यांचा अर्ज फेटाळल्यानंतर शामसुंदर बर्वे यांना काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतील, असं जाहीर केलं आहे.