मोठी बातमी ! पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढणार, भाजपच्या डोक्याला ताप; कसब्याच्या पुनरावृत्तीची भीती
भाजप नेते गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. त्यामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. ही जागा काँग्रेस लढणार असल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
नागपूर : भाजपच्या गोटात धाकधूक वाढवणारी एक बातमी आहे. भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर लवकरच निवडणूक लागणार आहे. बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तसे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. पुण्यात कसब्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? अशी भीती भाजपमध्ये निर्माण झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. आम्ही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. पुण्यात बिनविरोध निवडणूक होणार नाही. पोटनिवडणुकांवेळी भाजपने कुठे आम्हाला बिनविरोध निवडून येऊ दिलं. प्रत्येकवेळी भाजप लढली आहे. त्यामुळे आम्हीही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. ज्या ज्या निवडणुका येतील, त्या त्या महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.
50 लाख लोक जेलभरो करणार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. भाजप सरकार विरोधात आजपासून राज्यात काँग्रेसचं आंदोलन होणार आहे. जिल्ह्याजिल्ह्यात केंद्र सरकार विरोधात लोक आंदोलन करणार आहेत. राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केलीय. त्यामुळे या कारवाईच्या विरोधात आम्ही आजपासून आंदोलन करत आहोत. काँग्रेस या सरकारच्या विरोधात जेलभरो आंदोलन करणार आहे. देशभरात 50 लाख लोक जेलभरो आंदोलन करतील.
राहुल गांधी यांच्यावर कारवाई करून भाजपने पायावर धोंडाच मारून घेतला आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्याचं काम सुरू आहे. जोपर्यंत भाजपचं सरकार खाली खेचणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. आज संपूर्ण राज्यभर पत्रकार परिषदा घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दंगल म्हणजे मतांचं ध्रृवीकरण
संभाजी नगर जिल्ह्यात झालेल्या दंगलीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संभाजी नगरातील दंगल म्हणजे मतांचं ध्रृवीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कट करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घडवलेली दंगल आहे. माणसं पेरून दंगल घडवली. या घटनेची सखोल चौकशी व्हावी. कुठल्याही धर्माचे असोत, दोषींवर कारवाई केली पाहिजे. सखोल चौकशी केल्यास माहिती समोर येईल. देशातील इतर प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये म्हणून अशा प्रकारच्या घटना घडवल्या जात आहेत, असंही ते म्हणाले.