Nagpur Corona | कोरोनाचे निर्बंध धाब्यावर, कोचिंग क्लासेस सुरू, मनपाने काय केली कारवाई?
नागपुरात कोरोनाचे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. त्यामुळं मनपा प्रशासनानं कोचिंग क्लासेसवर कारवाई केली आहे. शिवाय इतर प्रतिष्ठानांवरही कारवाई करणे सुरूच आहे.
नागपूर : मनपाच्या उपद्रव शोध पथकाची बी. एस. एज्युकेशन द अप्टिटयुट स्कुलवर कारवाई करण्यात आली. बी. एस. एज्युकेशन द अप्टिटयुट स्कुलकडून 25 हजारांचा दंड वसूल करण्यात आलायं. आयडीयल कोचिंग इन्स्टिटयुटवर कारवाई करुन 25 हजार दंड वसूल करण्यात आलाय. नागपूर महानगरपालिकेने काल दिवसभरात नऊ प्रतिष्ठानांवर कारवाई केली. 85 हजार रुपयांचा दंड वसूल केला. शिवाय प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकानांवरही कारवाई केली. नागपूर महापालिकेतर्फे मंगळवारी सहा प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने ( Harassment Investigation Squad) धरमपेठ झोन (Dharampeth Zone) अंतर्गत श्यामकर व्हेंचर्स इन्फ्रा यांच्या विरूध्द रस्त्यालगत कचरा टाकल्याबद्दल आणि मेहाडिया चौक धंतोली (Dhantoli) येथील बेरर फायन्स लि. यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
प्लास्टिक पिशवीसंदर्भात कारवाई
धंतोली झोनमधील प्रभूनगर येथील मनोज पटेल यांच्या विरूध्द खुल्या भूखंडावर कचरा टाकल्याबद्दल आणि उल्लासनगर येथील सिध्दी विनायक बिल्डर्स यांच्या विरूध्द रस्त्यालगत कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच गांधीबाग झोन अंतर्गत बजेरिया येथील अनंता अडयाडवाले यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने सतरंजीपुरा तांडापेठ, चन्द्रभागानगर येथील महादेव स्वीटसवर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 37 नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 18 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४५ हजार ४९ नागरिकांविरुध्द कारवाई केली. आतापर्यंत दोन कोटी आठ लाख 83 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अद्यापही टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर विनामास्क नागरिक बाजारपेठेत फिरताना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.