हर घर दस्तक अभियान 30 नोव्हेंबरपर्यंत, मनपाची लसीकरणासाठी मोहीम
शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेतर्फे हर घर दस्तक अभियान 30 नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येईल.
नागपूर : शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेतर्फे हर घर दस्तक अभियान 30 नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येईल. घरोघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली आहे.
महसूल पोलीस विभागाची मदत
हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभागासह इतर विभाग, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
आशा वर्कर्स देणार घरोघरी भेटी
या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. आशा वर्कर्स प्रत्येक नागरिकांच्या घरी भेट देणार आहे. कुटुंबातील प्रत्येकाचे लसीकरण झाले की, नाही याची माहिती घेतली जाईल. कमी लसीकरण असलेल्या भागात शिबिरे आयोजित केली जातील. शहरातील झोपडपट्टी व अस्वच्छ भागात घरोघरी भेटी देण्यात येतील. संस्थयित व आजारी व्यक्तीची स्थिती जाणून घेतली जाईल.
शहरात 26,69,942 जणांचे लसीकरण
शहरात आतापर्यंत 26,69,942 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात 17,01,634 नागरिकांनी पहिला तर, 9,68,308 नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. या अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे. लसीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.
लसीकरणासाठी प्रोत्साहित केले जाणार
केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार, कोरोना विषाणूचा प्रचार रोखण्यासाठी हे अभियान राबविले जात आहे. लसीकरणासाठी आरोग्य विभागाची चमू शहरात फिरणार आहे. स्वयंसेवी, सामाजिक संस्था नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगणार आहे. एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.