Nagpur 12th result | बारावीच्या निकालात नागपूर मनपाची भरारी, 99.23 टक्के निकाल : तिन्ही शाखांमध्ये मुलीच अव्वल
विशेष म्हणजे तिन्ही विद्यार्थिनी मनपाच्या एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी आहेत. वाणिज्य शाखेमध्ये सुद्धा एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पहिला दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. 76.50 टक्क्यांसह सफुरा इरम मोहम्मद मुर्तजा अंसारीने प्रथम, 75.83 टक्क्यांसह सादिया परवीन समशेर आलमने द्वितीय आणि 57.17 टक्क्यांसह हुस्ना अंजूम फारूख मजीद खानने तृतीय स्थान मिळविले.
नागपूर : बारावीच्या निकालात नागपूर महापालिकेच्या महाविद्यालयांनी भरारी घेतली आहे. कला, वाणिज्य व विज्ञान या तिनही शाखांमधून मनपाने 99.23 टक्के निकालाची नेत्रदिपक कामगिरी नोंदविली आहे. विशेष म्हणजे, मनपाच्या तीन कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तीनही शाखांसह मागासवर्गीयांमधून प्रथम येण्याचा मान डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी नाजू राजेंद्र वासनिक (Naju Wasnik) हिने सर्वाधिक 89.33 टक्के गुण प्राप्त करून पटकाविला आहे. बारावीत घवघवीत यश संपादित करीत मनपाच्या महाविद्यालयाचे, शिक्षकांचे व पालकांचे नावलौकिक करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांना बुधवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. (Radhakrishnan b.), अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना (Deepak Kumar Mina), अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सन्मानित करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे, राजेंद्र सुके, संजय दिघोरे आदी उपस्थित होते. राधाकृष्णन बी. म्हणाले, विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून शिक्षक, मुख्याध्यापकांद्वारे करण्यात येत असलेल्या परिश्रमाचे फलीत आज विद्यार्थ्यांनी आपल्या यशामधून दिले आहे. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडीत होऊ नये यासाठी शिक्षण विभागाद्वारे विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण करण्यात आले होते. त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणामध्ये त्यांची अडचण दूर करून त्यांच्या यशातील अडथळे दूर करण्यासाठी उचलेले पाउल महत्वाचे ठरले. त्यातून विद्यार्थ्यांच्या यशाचा मार्ग सुकर झाल्याचेही ते म्हणाले.
हे आहेत यशस्वी विद्यार्थी
बारावीच्या परीक्षेत मनपाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिन्ही शाखेमध्ये उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. विज्ञान शाखेमधून नाजू राजेंद्र वासनिकने 89.33 टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकाविला. नाजू ही मागासर्गीय गटातूनही पहिली ठरली आहे. नाजूची आई मनपाच्या शिक्षण विभागात कार्यरत आहे. विज्ञान शाखेतून सुरज सुधाकर पवारने 86 टक्के गुणांसह दुसरा क्रमांक प्राप्त केला. त्याच्या वतीने त्याच्या आई-वडिलांनी सन्मान स्वीकारला. समीर शैलेंद्र जांभुळकर याने 85.67 टक्के गुण संपादित करीत तिस-या क्रमांकावर बाजी मारली. समीरचा थोरला भाऊ नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल कॉलेज) येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. समीरला सुध्दा भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे. तीनही विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. कला शाखेमध्ये मुस्कान परवीन मोहम्मद रफीक हिने 77.50 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. तर शबनम परवीन मोहम्मद शमीम हिने 74.67 टक्क्यांसह दुसरा व आयेशा परवीन मोहम्मद निसार हिने 70.67 टक्क्यांसह तिसरा क्रमांक प्राप्त केला.