Nagpur NMC | नगरसेविकेच्या पतीने सोडली कचरागाडीची हवा!; नागपुरात नेमकं काय घडलं?
धुरडे आणि कचरागाडी चालक यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यामुळं दीपक धुरडे यांनी कचरागाडीची हवाच सोडली. ही घटना गुरुवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी कचरा जमा करणाऱ्या कंपनीच्या पीआरओने दीपक धुरडे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला.
नागपूर : कचरा संकलन करणारी गाडी (Garbage Truck) केव्हा येईल, काही सांगता येत नाही. त्यांचा विशिष्ट असा वेळ नाही. कधी-कधी महिला वाट पाहून पाहून थकून जातात. पण, कचरा संकलन करणारी गाडी काही येत नाही. असाच प्रकार नेहरूनगर झोनअंतर्गत (Nehru Nagar Zone) घडला. गाडीला उशीर का झाला म्हणून लोकं नगरसेविकेच्या पतीला जाब विचारायला गेले. नगरसेविका दिव्या धुरडे (Corporator Divya Dhurde) यांचे पती दीपक धुरडे यांचा पारा गरम झाला. त्यांनी कचरागाडी चालक-वाहकास फैलावर घेतले. तेही त्यांच्यावरच संतापले. धुरडे आणि कचरागाडी चालक यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यामुळं दीपक धुरडे यांनी कचरागाडीची हवाच सोडली. ही घटना गुरुवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी कचरा जमा करणाऱ्या कंपनीच्या पीआरओने दीपक धुरडे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला.
सकाळची गाडी आली संध्याकाळी
नेहरूनगर, सक्करदरा या भागात काही ठिकाणी कचरागाड्या आहेत. पण, नगरसेविका ज्या भागात राहतात, त्या भागात नियमित कचरागाड्या नाहीत. यासंदर्भात दिव्या धुरडे यांनी नियमित कचरागाड्या याव्यात. परिसरातील कचरा उचलण्यात यावा, यासाठी पाठपुरावा केला. सकाळी येणारी कचरागाडी संध्याकाळी पाचच्या सुमारास आली. त्यामुळं दीपक धुरडे संतप्त झाले. त्यांनी कचरागाडीची हवा सोडली. उशीर का झाला म्हणून विचारणा केल्यावर कचरागाडीच्या चालकानं उलट मुजोरी केली. सकाळपासून लोकं कचरागाडीची वाट पाहत होते. ती संध्याकाळी उशिरा आल्यानं नागरिकांचा रोष होता. हा रोष व्यक्त झाल्याचे नगरसेविका दिव्या धुरडे यांनी सांगितलं.
दीपक धुरडे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार
हवा सोडल्यामुळे नेहरूनगर झोनमधील कचरा संकलनाला विलंब झाला, असा आरोप एजी एन्व्हायरो या कंचरा संकलन करणाऱ्या कंपनीने केला. याला सर्वस्वी नगरसेविकेचे पती दीपक धुरडे जबाबदार आहेत. या प्रकरणी एजी एन्व्हायरो या कचरा संकलन करणाऱ्या कंपनीच्या पीआरओने दीपक धुरडे यांच्या विरोधात सक्करदराला पोलिसांत तक्रार केली. अविनाश ठाकरे यांच्या कचरागाड्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी कचऱ्याचे वजन वाढविले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळं कचरागाडी ठेकेदारांविरोधात जनतेचा रोष आहे. हा रोष या निमित्तानं व्यक्त झालाय.