Prajakta Mali | आमदार संजय राठोडांनी जमवली गर्दी, प्राजक्ता माळीला पाहण्यासाठी जनसागर; शासकीय नियम मोडले?
सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलावंत अरुण कदम व समीर चौगुले यांना कार्यक्रमाला बोलवले. या कलाकारांना पाहण्यासाठी दिग्रसमध्ये प्रचंड गर्दी झाली होती.
यवतमाळ : शासनाचे नियम डावलून आमदार संजय राठोडांनी गर्दी जमवली. सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळीला बघण्यासाठी दिग्रसमध्ये जनसागर उसळला होता. निमित्त होते कलाकारांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळ्याचे. यानिमित्तानं चर्चा सुरू झाली ती यामुळं शासकीय नियमांचा भंग झाला का याची…
नाट्यगृह आणि व्यापारी संकुलाची भूमिपूजन
राज्याचे माजी मंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी त्यांच्या मतदारसंघातील दिग्रस येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुल या इमारतींच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलावंत अरुण कदम व समीर चौगुले यांना कार्यक्रमाला बोलवले. या कलाकारांना पाहण्यासाठी दिग्रसमध्ये प्रचंड गर्दी झाली होती.
विकासकामांचा केला गाजावाजा
एकीकडे राज्यात वाढत्या कोविड संसर्गामुळे राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली. असे असताना सत्ताधारी पक्षाचे शिवसेनेचे आमदार यांनी विकासकामांचा मोठा वाजागाजा करत भूमिपूजन केले. दरम्यान, या कार्यक्रमाला कलावंतांना बघण्यासाठी शहरासह परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. नियम फक्त सर्व सामान्य नागरिकांचा आहेत का अशी चर्चा सुरू होती. आता आमदार महोदयांवर कारवाई कोण आणि कशी करणार हा प्रश्नच आहे.
मंत्रीपदाचा द्यावा लागला होता राजीनामा
संजय राठोड हे राज्याचे वनमंत्री होते. परंतु, त्यांना वादग्रस्त कारणामुळं राजीनामा द्यावा लागला होता. सद्या ते आमदार आहेत. बंजारा समाजाचा पाठिंबा असल्यानं त्यांच्याकडे लोकांची गर्दी असते. भूमिपूजन गाजावाजा करत करायचं असं ठरविल्यानं कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळं त्यांचे विरोधक आता यावर आक्षेप घेत आहेत.