Nagpur प्रदूषण कमी करण्यासाठी मनपाचा नवा फंडा, सायकल चालवा प्रदूषण वाचवाचा संदेश
सायकलचा वापर वाढल्यास प्रदूषण कमी होईल. नागरिकांचे आरोग्य चांगले राहील. सायकल सुरक्षित राहील. इंधनाच्या बचतीसोबतच पैशाचीसुद्धा बचत होईल, असेही मनपा आयुक्त राधाकृष्णन म्हणाले.
नागपूर : शहरात प्रदूषणाचं प्रमाण वाढतंय. त्यावर उपाय करण्यासाठी मनपा वेगवेगळे उपक्रम राबवत असते. असाच एक उपक्रम मनपानं सुरू केलाय. सायकल चालवा, प्रदूषण वाचवाचा संदेश यानिमित्तानं मनपा देतेय.
पर्यावरणपूरक वाहन व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागिरकांना सायकल चालविण्यास प्रोत्साहित करण्याचा हेतू आहे. या हेतूनं नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपा मुख्यालय परिसरात प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक सायकल स्टॅन्ड सुरू केलंय. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या सायकल स्टॅन्डची पाहणी केली. कर्मचाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे, उपअभियंता अजय डहाके, स्मार्ट सिटीच्या डॉ. प्रणिता उमरेडकर, प्रकल्प कार्यकारी डॉ. पराग अरमल आदी उपस्थित होते. सध्या कुठेही मोटारसायकल आणि कारसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली असते. मात्र सायकल पार्क करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसते. त्यामुळे सायकलच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुणीही सायकलचा वापर करीत नाही. ग्रीन मोबिलिटी आणि नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्टेशनला चालना देण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रायोगिक तत्वावर पर्यावरणपूरक सायकल स्टॅन्ड सुरू करण्यात आले आहे.
इंधनाच्या बचतीसोबतच पैशाचीसुद्धा बचत
सायकलचा वापर वाढल्यास प्रदूषण कमी होईल. नागरिकांचे आरोग्य चांगले राहील. सायकल सुरक्षित राहील. इंधनाच्या बचतीसोबतच पैशाचीसुद्धा बचत होईल, असेही मनपा आयुक्त राधाकृष्णन म्हणाले. शहरातील इतर सरकारी कार्यालयांनीसुद्धा अशा प्रकारचे सायकल स्टॅन्ड सुरु करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केलं. या सायकल स्टॅन्डवर सायकल चालवा, आरोग्य टिकवा, सायकल चालवा पर्यावरण वाचवा, पृथ्वी को प्रदूषणमुक्त बनाये, सायकल चलाये अशा प्रकारची पर्यावरणपूरक संदेश देणारे फलक सुद्धा लावण्यात आले आहेत.