Nagpur Deekshabhoomi | बाबासाहेबांच्या निर्वाणाचा सांगावा पोचवणारे दामू मोरे, महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला आठवणीला उजाळा
काकांसोबत बाबासाहेबांचे दर्शन घेण्याची संधी दामुदांना मिळाली होती. बाबासाहेबांचा डावा पाय चेपून देण्याचं भाग्य लाभलं. भाग्य मानत नाही. परंतु बाबासाहेबांच्या अंगाला हात लावण्यामुळे आयुष्य सफल झाल्याचं सागंत असताना सहा डिसेंबरची आठवण सांगताना मात्र त्यांना राहावले नाही.
नागपूर : दामुदांनी आज वयाची पंच्याहत्तरी गाठली आहे. नेताजी मार्केट परिसरातील समता सैनिक दलाच्या कार्यालयात सुनील सारिपुत्त यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसमोर त्यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला आठवणीला उजाळा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 ऑक्टोबर 1956 च्या धम्मदीक्षा सोहळ्यात दामूदांचे काका नामदेव मोरे अग्रणी होते.
दीक्षा समारंभात नामदेव मोरे यांनी लाऊडस्पीकर लावला होता. काकांसोबत बाबासाहेबांचे दर्शन घेण्याची संधी दामुदांना मिळाली होती. बाबासाहेबांचा डावा पाय चेपून देण्याचं भाग्य लाभलं. भाग्य मानत नाही. परंतु बाबासाहेबांच्या अंगाला हात लावण्यामुळे आयुष्य सफल झाल्याचं सागंत असताना सहा डिसेंबरची आठवण सांगताना मात्र त्यांना राहावले नाही.
बाबासाहेब गेले…
पहाटेची वेळ…रिक्षात बॅटरी. हातात माईक अन् डोळ्यात वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा, कंठ दाटून येत होता. तोंडून शब्द फुटत नव्हता…पण, “बाबासाहेब गेले…’ येवढेच शब्द बाहेर येत होते अन् त्यापाठोपाठ रडू… डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणाचा सांगावा घेतला. नागपुरातील आंबेडकरवाद्यांच्या वस्त्या त्यांनी पालथ्या घातल्या होत्या. काहींना बाबासाहेब गेले ही वार्ताच सहन होत नसल्याने खोटे सांगतोस असे म्हणत, बाबांच्या अनेक कार्यकर्त्यांकडून मार खावा लागला होता. सहा डिसेंबर 1956 च्या दुःखद घटनेच्या गाठी उकलताना त्यांचे डोळे पाणावले. डोळ्यांच्या काठावरचे पाणी त्यांनी बोटांनी टिपले. पुन्हा आठवणी सांगू लागले. त्यांचे नाव दामू मोरे अर्थात चळवळीतील दामूदा…
दामुदा ढसाढसा रडले
चळवळीतील कार्यकर्त्यांसमोर दामुदा ढसाढसा रडले. रिक्षात बसून सांगावा सांगण्यासाठी आनंदनगर, भानखेडा, नवी शुक्रवारी, कर्नलबाग, जोगीनगर, इंदोरा या वस्त्यांमध्ये सांगावा पोहचविला. त्यानंतर रिक्षातून रेल्वेस्टेशनवर गाठले. साऱ्या फलांटावर गर्दीच गर्दी होती. सारी गर्दी रडणारी होती. दुःखाचा डोंगर कोसळल्याने टाहो फोडणारी ती गर्दी, आक्रोश आक्रंदन करणाऱ्या गर्दीचे एकच ध्येय होते. मुंबईत बाबासाहेबांच्या अंतिम दर्शन घेणे. “बाबासाहेब अमर रहे’च्या घोषणांचा आवाज देत जी गाडी दिसेल त्या गाडीत लोकांचे लोंढेच्या लोंढे बसत होते. धम्मदीक्षा सोहळ्याचा आनंद अनुभवणाऱ्या नागपूर शहराने अवघ्या दोन महिन्यांत काळोखे दुःख अनुभवले. या आठवणींना उजाळा देताना दामुदांनी अजूनही बाबासाहेबांच्या डाव्या पायावर आपला हात असल्याचा भास होत असल्याचे सांगितले.
जिवंत गाडण्याची धमकी
इतवारीतील दोन माळ्याच्या घरात आपल्या काकासोबतच राहत होतो. जमिनीवर झोपलो होते. दरवाज्यावर थाप पडताच काकांनी दरवाजा उघडला. दरवाजात रेवाराम कवाडे, एच. एल. कोसारे, माणके गुरुजी ही मंडळी होती. काकाला आवाज देण्यास सांगितले. काका नामदेवराव यांना पाहताच रेवाराम कवाडे यांच्या तोंडातून “बाबा गेले’ हे दोनच शब्द बाहेर आले आणि रडायला लागले. निधनाचे वृत्त पोहोचवण्याची जबाबदारी काकांनी माझ्याकडे दिली. रिक्षातून लाऊडस्पीकर घेऊन शहरात फिरलो. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी लोकांना कशी सांगायची. ते मला लिहून देण्यात आले होते. ते मी वाचत होतो. बाबासाहेब गेले. वाचलं की, लोक रडायचे. काहींनी वृत्त खोटे निघाल्यास जिवंत गाडण्याची धमकीच दिली. सांगावा सांगत असताना माझ्या डोळ्यातूनही अश्रूंच्या धारा वाहत असल्याचे पाहून लोक शांत झाले.