Rice Shopping | धानपिकाच्या क्षेत्रात घट, त्यात रोगांचा प्रादुर्भाव; तरीही तांदळाची खरेदी कमी?
धान पिकाच्या पेरणी क्षेत्रात घट झाली. रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं धानाच्या उत्पादनात घट झाली. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत प्रामुख्यानं धानपीक घेतले जाते. यंदा राईस मिलवर धानाचा उतारा कमी मिळत आहे.
तेजस मोहतुरे
भंडारा : कोरोनाची भीती काही जात नाही. खरेदीसाठी लोकं बाजारात कमी जाताना दिसतात. त्यामुळं तांदळाची खरेदी कमी होत आहे. हे असच राहीलं तर येत्या काही दिवसांत तांदळाच्या किमती कमी होतील, असा अंदाज आहे.
धानाचा उतारा कमी
पूर्व विदर्भात धानपीक होते. धान पिकाच्या पेरणी क्षेत्रात घट झाली. रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं धानाच्या उत्पादनात घट झाली. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत प्रामुख्यानं धानपीक घेतले जाते. यंदा राईस मिलवर धानाचा उतारा कमी मिळत आहे. धानापासून तांदूळ तयार होण्याच्या प्रक्रियेला उतारा म्हणतात.
खर्च अठरा हजारांवरून 26 हजारांवर
धानपिकाच्या लागवडीचा खर्च साधारणताहा एकरी 18 हजार रुपये येतो. पण, यंदा पाऊस लांबल्याने रोवण्या खोळंबल्या. काही जणांचे पऱ्हे (धानाचे रोप) वाळले. याचा परिणाम धानाच्या उत्पादनावर झाला. शिवाय खताच्या किमती वाढल्या. त्यामुळं उत्पादन खर्च यंदा 26 हजारांच्या घरात गेला.
शेतकऱ्यांचेही नुकसान
यंदा धानपिकांचे नुकसान झाले. त्यामुळं राज्य सरकारने धानाला बोनस द्यावा, अशी मागणी विधानसभेत करण्यात आली. पण, धानाला काही बोनस मिळाला नाही. धानाचा उतारा पन्नास टक्केच येत आहे. त्यामुळं तांदळाची किंमत वाढायला पाहिजे. पण, यंदा धानाला दोन हजार 450 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील धानाला जास्त भाव मिळत आहे. कारण विदर्भातील तांदुळ चांगल्या गुणवत्तेचा निघाला नाही.
खासगी व्यापारी करतात नगदी खरेदी
भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राईस मिल आहेत. शेतकरी त्यांचा माल खासगी व्यापाऱ्यांना देतात. त्यामुळं त्यांना योग्य तो भाव मिळत नाही. धान खरेदी केंद्रावर विक्री केल्यास शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. शिवाय कधीकधी बोनस मिळतो. पण, तो वेळेवर मिळत नाही. त्यामुळं धान खासगी व्यापाऱ्याला विकावे लागते.