राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही, देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर खोचक टीका
भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या मुंबईतील आंदोलनात बैलगाडी कोसळल्यावरुन जोरदार टोलेबाजी केलीय.
नागपूर : भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या मुंबईतील आंदोलनात बैलगाडी कोसळल्यावरुन जोरदार टोलेबाजी केलीय. “काँग्रेसच्या आंदोलनात बैलगाडी कोसळल्याचा व्हिडीओ पाहिला तर राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे ती बैलगाडी तुटली, असं ते चित्र आहे. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत,” असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं (Devendra Fadnavis criticize Rahul Gandhi and Congress over protest in Mumbai).
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्ष पदासाठी शुभेच्छा आहेत. मात्र त्यांनी पदावर गेल्यावर किमान निष्पक्षपणे काम करावे अशी अपेक्षा आहे. तसेच त्या पदाची उंची वाढवण्यासाठी काम करावं. आघाडीच्या तीन पक्षांमध्ये अध्यक्ष पदाबद्दल एकमत नाही. एकमत असतं असते तर आतापर्यंत विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असती.”
“प्रीतम मुंडे नाराजीवर पतंगबाजी करायची आहे त्यांनी करावी”
प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडलात समावेश न झाल्यानं बीडमध्ये आंदोलन होत आहेत यावर प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, “काल पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे, मला वाटते त्यानंतर बोलायची गरज नाही. ज्यांना पतंगबाजी करायची आहे त्यांनी करावी.”
“सहकार बुडवला त्यांनाच या नव्या सहकार खात्यासंदर्भात भीती”
“ज्यांनी सहकार चळवळीमध्ये चुकीचे काम केलेत, सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्यासंदर्भात भीती आहे. ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे, त्यांनी नव्या सहकार खात्याचं स्वागतच केलं आहे. अमित शहा खूप आधीपासून सहकार चळवळीत आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाली आहे,” असं सांगत त्यांनी सहकार मंत्रालयावरुन टीका करणाऱ्यांना लक्ष्य केलं.
“विदर्भ आणि मराठवाड्यातील बँकांना मदत करण्याचा निर्णय घ्यावा”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत. आमच्या नगरसेवकांनी कोविड काळामध्ये चांगले काम केले आहे. पीक कर्जाचा आढावा घेतल्यावर लक्षात येते की फक्त 18 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन बँकांना कर्ज वाटपबद्दल निर्देश द्यावेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील बँकांना मदत करण्याचा निर्णय घ्यावा.”
“आघाडी सरकार मध्यावधी निवडणूकांची हिम्मत करणार नाहीत”
“पूर्व विदर्भात ज्या तांदूळ घोटाळ्याचे आरोप होत आहे त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेले आहे. मध्यावधी निवडणूका होतील की नाहीत याचा निर्णय सरकारला करायचा आहे. मात्र ते तशी हिम्मत करणार नाहीत. कारण त्यांना माहित आहे निवडणूक झाली तर ते धाराशाही होतील. या सरकार विरोधात लोकांमध्ये खूप नाराजी आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
विजय वडेट्टीवार यांची दारुदुकानदारांनी केलेल्या पुजेवर ते म्हणाले, “या मंत्रांच्या बाबतीत असेच होणे अपेक्षित आहे. उद्या सट्टेबाजांनी या मंत्र्यांची पूजा केली तर काही नवल वाटायला नको.”
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले, “मी हरी नरके यांच्याशी काय चर्चा करू त्यांचे बॉस छगन भुजबळ यांच्या सोबत या विषयावर अकॅडमिक मुद्द्यांवर चर्चा करायला मी तयार आहे.”
संबंधित व्हिडीओ पाहा :
हेही वाचा :
फडणवीस सरकारमधील फोन टॅपिंग प्रकरण, त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन
विधानसभेतील गोंधळावर फडणवीस बोलतात त्यात तथ्य नाही, भास्कररावांनी घडलेलं रेकॉर्डवर आणलंय, अजित पवारांचा पलटवार
जोपर्यंत आज्ञा असेल तोपर्यंत विरोधात बसणार; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
Devendra Fadnavis criticize Rahul Gandhi and Congress over protest in Mumbai