राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी बालाजी किल्लारीकर यांच्या आरोपांनादेखील प्रत्युत्तर दिलं. "मागासवर्गीय आयोगाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांनी सर्वात पहिली भेट कुणाची घेतली? त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. कारण त्यांची नियुक्ती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केली होती", अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.
नागपूर | 12 डिसेंबर 2023 : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपर्वीच मागासवर्ग आयोगाच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. यामधील सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्य मागासवर्ग आयोगात सरकारचा हस्तक्षेप वाढला होता. आयोगाचे स्वतंत्र अबाधित राहावे, यासाठी आम्ही हे राजीनामे दिले आहेत, असं किल्लारीकर म्हणाले होते. त्यानंतर या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सुरुवातीला फडणवीस यांनी किल्लारीकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. तसेच आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्यावरही प्रतिक्रिया दिली.
“आम्ही आभ्यासक घेतले, त्यांनी आयोगावर कार्यकर्ते घेतले होते. मागासवर्गीय आयोगाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांनी सर्वात पहिली भेट कुणाची घेतली? त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. कारण त्यांची नियुक्ती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केली होती. पहिली गोष्ट तर हा विभागच माझ्याकडे येत नाही. त्यामुळे या विभागात माझा दबाव असणे याचा संबंध नाही. हा विषय माझ्याकडे, माझी त्याबाबत चर्चा नाही. काय सर्व्हे करावा, कसा करावा हे आयोग ठरवतात”, अशी पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘त्यांच्या पोलिटिकल मास्टरने त्यांना सुपारी दिलीय की…’
“ते राजीनामा देत आहेत किंवा अजूनही एक-दोन सदस्य असे आहेत की, त्यांचा डाव आहे की, मराठा आरक्षणाचा निर्णय होऊ नये. या विषयाचं भिजत घोंगडं राहावं. त्यांच्या पोलिटिकल मास्टरने त्यांना अशाप्रकारे त्या ठिकाणी एकप्रकारची सुपारी दिली आहे की, कुठल्याही प्रकारे मराठा आरक्षणाच्या विषयावर कामकाज वेगाने करु नका”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे. त्याचवेळी कुठल्याही परिस्थितीत ओबीसींवर कुठालाही अन्याय करायचा नाही ही राज्य सरकारची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे अशाप्रकारचे कार्यकर्ते आयोगात घुसवून, मग त्यांचे राजीनामे झाल्यावर त्यांनी केलेले स्टेटमेंटला कुठलंही महत्त्व नाही. त्यांचा वेगवेगळ्या समाजाबद्दल अभ्यास नाही. त्यामुळे मी त्याला महत्त्व देत नाही. हा राजकीय कार्यकर्त्याचं स्टेटमेंट आहे. ते कुणाचं स्टेटमेंट वाचत आहे ते स्पष्ट आहे”, असं शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी किल्लारीकर यांच्या आरोपांना फेटाळलं.
आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्यावर फडणवीस काय म्हणाले?
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्यावरही प्रतिक्रिया दिली. “निरगुडे साहेब माध्यमांसमोर काय बोलले ते मी पाहिलं. त्यांच्या राजीनाम्यातही म्हटलं आहे. त्यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देताना कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. किंबहुना आमची अपेक्षा होती की, त्यांनी अधिक काळ काम केलं पाहिजे. ते चांगलं काम करत होते. पण त्यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिला. आम्ही तर त्यांना सुचवत होतो की, अन्य काही जबाबदारी हवी असेल तर घ्या. पण शेवटी ते त्यांच्यावर आहे. त्यांनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.