दिवसभर विधानसभेच्या कामकाजात व्यस्त, सभागृहात गदारोळ, संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांची ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया
राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष यांच्या युतीला सर्वाधिक विजय मिळाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
नागपूर : राज्याच्या राजकारणात आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विधिमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरुय. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाचा दुसरा दिवस आज प्रचंड गाजला. कारण नागपूरच्या न्यासा भूखंड घोटाळा प्रकरणी विरोधकांनी सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं म्हणत यावर सभागृहात चर्चा करता येणार नाही, अशी भूमिका मांडली. तसेच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपण कोणाताही गैरव्यवहार केलेला नाही, असं स्पष्ट केलं. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. विशेष म्हणजे दिवसभरात या सगळ्या घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली.
राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष यांच्या युतीला सर्वाधिक विजय मिळाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर सभागृहाचं कामकाज थांबलं. त्यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली. विरोधकांच्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली.
‘युतीने 3029 ग्रामपंचायती जिंकल्या’
“ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप या आमच्या युतीला दणदणीत विजय मिळाला आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेरीमध्ये आमच्या 3029 एवढ्या ग्रामपंचायती आल्या आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये सगळीकडे आमची सरशी झालेली आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेन. या सहा महिन्यांच्या कारभारावर एकप्रकारे ग्रामीण जनतेने पसंती दाखवलीय. मी त्यासोबत आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचंही अभिनंदन करेन. त्यांनी अविरत प्रयत्न करुन भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी वातावरण तयार केलं’, असं फडणवीस म्हणाले.
‘जनतेनेसुद्धा सांगितलं की हेच कायदेशीर सरकार’
“जे लोकं आमच्या सरकारला नावं ठेवत होते आणि स्वत: इनलिटमेंट असताना आमच्या सरकारला म्हणत होते त्यांना न्यायालयाने सांगितलंच होतं, पण आता जनतेनेसुद्धा सांगितलं की हेच कायदेशीर सरकार आहे. ही जनता याच सरकारच्या पाठीशी आहे”, असा टोला फडणवीसांनी लगावला.
“मी महाराष्ट्राच्या जनतेचं आभार मानतो. आम्ही त्यांना आश्वस्त करु इच्छितो, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचं सरकार अशाचप्रकारे ग्रामीण जनतेच्या पाठीशी उभी राहील”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.