Ganesh Naidu : वैदर्भीय रंगभूमीचे भूषण गणेश नायडू यांचे निधन, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली शोकसंवेदना
वैदर्भीय रंगभूमीचे भूषण असलेले ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमी पोरकी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायडू यांना श्रद्धांजली वाहिली.
नागपूर : ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक गणेश नायडू (Ganesh Naidu) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 83 वर्षांचे होते. तुषार व हेमंत ही दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. मानेवाडा स्मशानघाटावर (Manewada Cemetery) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गणेश नायडू हे 1954 पासून नाट्य क्षेत्रीशी जुळले. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे काम केलं. गणेश नायडू यांनी 85 नाटकं व 46 एकांकिकांचे नेपथ्य केलं. 19 नाटकांचे व 8 एकांकिकांचे दिग्दर्शन केलं. पाच बालनाट्यांची नेपत्थ व प्रकाशयोजना केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना
नागपूर : वैदर्भीय रंगभूमीचे भूषण असलेले ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमी पोरकी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायडू यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, गणेश नायडू हे मराठी रंगभूमीवरील एक मोठे नाव होते. विविध कलागुण संपन्न असलेले नायडू यांनी ख्यातनाम प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार आणि नट, दिग्दर्शक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. विदर्भात हौशी रंगभूमीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आपण कधीही विसरू शकत नाही. रंजन कला मंदिर नावारुपाला आणण्यातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. राज्य शासनाच्या विविध नाट्य स्पर्धांमध्ये तसेच इतर व्यासपीठांवर त्यांच्या नाटकांना रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असे. हौशी नाट्य कलाकारांना आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्न करत असत. त्यांच्या निधनाने वैदर्भीय रंगभूमीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. आयुष्यभर अतिशय निष्ठेने नाट्यकलेची त्यांनी सेवा केली. त्यांचे कुटुंब, मित्र परिवार यांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
रंगभूमीचा आधारवड हरपला – सुधीर मुनगंटीवार
ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमीचा आधारवड हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. गणेश नायडू यांनी ज्येष्ठ नाटककार रंगकर्मी पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तर यांच्या सोबतीने हौशी रंगभूमीवर अनेक दर्जेदार नाटके दिली आहेत. राज्य शासनाच्या राज्य नाट्यस्पर्धेत त्यांची अनेक नाटके पारितोषिक प्राप्त ठरली. उत्तम नेपथ्यकार, दिग्दर्शक अशी भरीव कामगिरी त्यांनी केली आहे. त्यांच्या कौशल्यातून साकारलेले अनेक नाटकांचे नेपथ्य प्रेक्षकांना भुरळ घालायचे. विदर्भातील हौशी रंगभूमीच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने नाट्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयाना देवो व त्यांच्या पुण्यात्म्याला शांती प्रदान करो असेही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.