जमतील तेवढी मुलं जन्माला घाला; कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांचा सनातनींना अजब सल्ला
यापूर्वीही देवकीनंदन महाराज यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. प्रियाकान्तजू मंदिरात एका मुस्लिम संघटनेच्या नावाने पत्रही आलं होतं. हिंदूत्वाचा प्रचार केल्यास सामुहिक नरसंहार करण्याची धमकी देण्यात आली होती.
नागपूर : लोकसंख्या नियंत्रणावर भागवत कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा येत नाही. तोपर्यंत जमतील तेवढी मुलं जन्माला घाला. प्रत्येक सनातनींनी किमान पाच सहा मुलं जन्माला घालावीत, असा अजब सल्ला दिला आहे. तसेच सनातनी बोर्डाची स्थापना करावी. या बोर्डात धर्माचार्यांना घेण्यात यावं, अशी मागणीही देवकीनंदन ठाकूर यांनी केली आहे.
लोकसंख्येवर आजपर्यंत नियंत्रण आणता आलेलं नाहीये. लोकसंख्येचा एवढा मोठा स्फोट झाल्या याचा कोणी विचारही केला नसेल. 4 बायका आणि 40 मुले असतात. त्यावर कोणी बोलत नाहीये. स्वातंत्र्यानंतरचं सनातनवरील हे सर्वात मोठं आक्रमण आहे, असं देवकीनंदन ठाकूर म्हणाले.
जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा येत नाही, तोपर्यंत प्रत्येक सनातनीने जमतील तेवढी मुलं जन्माला घालावी. त्यासाठी वेळेत लग्न करा आणि किमान पाच सहा मुलं तरी जन्माला घाला, असं आवाहनच त्यांनी केलं आहे.
बॉम्बने उडवून देण्याची धमकी
गेल्यावर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देवकीनंदन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. सौदी अरबमधून एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून फोन करत शिवीगाळ केली होती. त्यानंतर या व्यक्तीने देवकीनंदन यांना भरचौकात जिवंत जाळण्याची धमकी दिली होती. त्याची महाराष्ट्र पोलिसांनी गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली होती.
सौदीतून फोन
देवकीनंदन ठाकूर महाराज यांच्या पर्सनल मोबाईलवर सौदीतून फोन आला होता. हा फोन घेतल्यानंतर त्यांना धमकावण्यात आलं होतं. मुस्लिमांच्या विरोधात बोलत असल्याचा आरोप करून या व्यक्तीने देवकीनंदन यांना शिवीगाळ सुरू केली होती. त्यांना बॉम्बने उडवून देण्याची आणि जिवंत जाळण्याची धमकीही देण्यात आली होती.
अनेकदा धमक्या
यापूर्वीही देवकीनंदन महाराज यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. प्रियाकान्तजू मंदिरात एका मुस्लिम संघटनेच्या नावाने पत्रही आलं होतं. हिंदूत्वाचा प्रचार केल्यास सामुहिक नरसंहार करण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी वृदांवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्लीला जाताना त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नही झाला होता.