गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 5 ऑक्टोबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतचं मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे हेच सध्या मुख्यमंत्री राहतील. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर त्यांना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याला आता राष्ट्रवादीचे नेते दुजोरा देताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा यांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा अर्थच उलगडवून सांगितला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम मीडियाशी संवाद साधत होते. पाच वर्षाकरता होईल की आणखी काय होईल हे माहीत नाही. पण अजितदादा मुख्यमंत्री होणार आहेत. लवकरच मुख्यमंत्री होतील, असा दावा धर्मरावबाबा अत्राम यांनी केला आहे. अजितदादा पुढच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होणार आहे काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर तसं काही नाही. केव्हाही होतील. राजकारण काही सांगून येत नाही. राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही, असं सूचक विधान धर्मरावबाबा यांनी केलं.
अजितदादा मुख्यमंत्री बनू शकतात हाच फडणवीस यांच्या विधानाचा अर्थ आहे. पुढच्या निवडणुकीनंतर किंवा त्यापूर्वीही दादा मुख्यमंत्री होऊ शकतात. दादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
तसेच पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून अजितदादा यांच्या नाराजीचा प्रश्नच नव्हता. पुण्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला द्यायचं हे आधीच ठरलं होतं. फक्त ते देण्यासाठी थोडा उशीर झाला. तर पुण्याचं पालकमंत्रीपद गेल्याने चंद्रकांत पाटील नाराज नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. हे आधीपासून ठरलं होतं. खासदार प्रफुल्ल पटेल यांचा हा जिल्हा आहे. त्यामुळे मोठी जबाबदारी आहे. पालकमंत्री म्हणून काम करताना गोंदिया जिल्ह्यात पक्ष मजबूत करणे आणि राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यावर आमचा भर राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दिवाळीचा सण जवळ येतोय. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोरांवर आळा बसवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग संपूर्ण राज्यात धाडसत्र राबवणार आहे. भेसळ थांबवण्यावर आमचा भर आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच नागपूरातील सडक्या सुपारीच्या उत्पादनावर एक मोठी कारवाई आमच्या विभागाने केलीय. आणखी कारवाई करण्यात येणार आहे. आम्ही आतापर्यंत सव्वादोन कोटीची सुपारी जप्त केलीय, अशी माहितीही त्यांनी दिली.