Nagpur Medical | मरावे परी कीर्तीरुपी उरावे! 82 वर्षीय ज्येष्ठाचं देहदान; मेडिकलच्या विद्यार्थ्यांना का हवंय मृत शरीर?
खामल्यातील एका व्यक्तीनं वयाच्या सत्तराव्या वर्षी देहदानाचा संकल्प केला. वयाच्या 82 व्या वर्षी मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शरीर मेडिकलला दान देण्यात आले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला.
नागपूर : मेडिकल (Medical) कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मृत शरीराची आवश्यकता पडते. एखाद्या व्यक्तीनं देहदान केल्यास त्या शरीरावर अभ्यास करता येतो. पण, देहदानाची संख्या एवढ्यात रोडावली. असं असलं तरी खामल्यातील एका व्यक्तीनं वयाच्या सत्तराव्या वर्षी देहदानाचा संकल्प केला. वयाच्या 82 व्या वर्षी मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शरीर मेडिकलला दान देण्यात आले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला.
खामल्यातील 82 वर्षीय वसंत सरदेसाई यांची 7 डिसेंबरला प्रकृती खालावली. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले. चाचण्यांमध्ये निमोनिया व कोरडा खोकला झाल्याचे निदान झाले. वय जास्त असल्याने ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. 23 डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
दहा वर्षांपूर्वीच देहदानाचा संकल्प
सरदेसाई यांनी मृत्यूच्या दहा वर्षांपूर्वीच मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला होता. ते नेहमी आपल्या पत्नीशी याबाबत चर्चा करीत होते. त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते की, अंत्यसंस्कारावर पैसा खर्च करायचा नाही. मृत्यूनंतर आपले शरीर रुग्णालयाला दान देण्यात यावे. कुटुंबीयांनी मृत शरीर मेडिकलला दान दिले. सरदेसाई यांचा देहदानाचा संकल्प पूर्ण करायचा होता. अशात देहदानासाठी कुणाशी संपर्क साधायचा, असा प्रश्न त्यांची मुलगी आरती व पत्नी रेखा यांच्यापुढे होता. त्यांनी मेयो-मेडिकलमध्ये कार्यरत ट्रांसप्लांट को-ऑर्डिनेटर प्रार्थना द्विवेदी यांचा संपर्क क्रमांक मिळविला. द्विवेदी यांनी आई व मुलीचे समुपदेशन केले. कुटुंबीयांचे समाधान झाल्यानंतर देहदानास होकार दर्शविला. यानंतर सरदेसाई यांचे शरीर मेडिकलला आणण्यात आले.
देहदानापूर्वी आरटीपीसीआर चाचणी
कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून रात्री उशीर झाल्याने मृत शरीर शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आले. कोविड नियमांनुसार देहदानापूर्वी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक होते. यासाठी सरदेसाई यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर शुक्रवारी दुपारी बारा वाजता देहदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कुटुंबीयांना मेडिकलकडून प्रमाणपत्रही जारी करण्यात आले.
समुपदेशन 14 चं, देहदान एकाचं
शासकीय रुग्णालयात देहदान घटल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणास अडथळा निर्माण होत आहे. मृतकांच्या कुटुंबीयांशी संपर्क करून त्यांना मरणोपरांत देहदानासाठी समुपदेशन करते. परंतु कोविड काळात अनेक लोक पुढे आले नाही. या काळात 14 कुटुंबीयांचे समुपदेशन केले. परंतु एकच कुटुंबच यासाठी तयार झाले. वसंत सरदेसाई यांच्या कुटुंबीयांनी देहदानाप्रती जागरूकतेचे उदाहरण समाजापुढे ठेवले असल्याचं ट्रांसप्लांट को-ऑर्डिनेटर प्रार्थना द्विवेदी यांनी सांगितलं.