नागपूर: भोंग्यांविरोधी आंदोलनातील मनसेच्या (mns) कार्यकर्त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या कार्यकर्त्यांचा शोध घ्यायला ते पाकिस्तानातील अतिरेकी आहेत की हैद्राबादमधील रझाकार? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी केला होता. त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मग आरोपींना कसं शोधायचं हे राज ठाकरेंनीच सांगावं, असा टोला दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी लगावला आहे. पोलीस पोलिसांचं काम करत आहेत. कायद्याने जे जे करायचं ते पोलीस करत आहेत. पण ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी पोलिसांना सरेंडर झालं पाहिजे, असंही वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. मीडियाशी संवाद साधताना दिलीप वळसे पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहून मनसे कार्यकर्त्यांवर होत असलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. या पत्रावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आरोपीला शोधण्याच काम पोलिसांच असतं. पोलीस आपलं काम करत आहे. खरं म्हणजे ज्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहे त्यांनी पोलिसांना सरेंडर झालं पाहिजे. किंवा पोलिसांसमोर उपस्थित झालं पाहिजे. राज ठाकरे म्हणतात की, ते दहशतवादी नाहीत. मात्र पोलीस त्यांना दहशतवाद्यांप्रमाणे शोधत आहेत. मग राज ठाकरे यानी गुन्हेगारांना कसं शोधायचं ते सांगावं, असा चिमटा दिलीप वळसे पाटील यांनी काढला. पोलीस कायद्याप्रमाणे काम करत असतात. त्यात काही चुकीचं नाही. पोलीस आपल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे त्यात कोणी नाराज होण्याच काही कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी नागपूरमध्ये मिळालेल्या स्फोटकांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काल काही स्फोटकं नागपूरला मिळाली. त्यासंदर्भात रात्री चर्चा झाली. पोलीस त्याचा तपास करत आहे. अजूनपर्यंत त्याची स्पष्टता आलेली नाही, असं त्यांनी सांगितलं. नांदेड संदर्भात जास्त बोलणे उचित नाही. त्यावर पोलिसांचे लक्ष आहे. पोलीस त्याप्रमाणे ट्रॅक करत आहेत. काही आरोपी सापडले आहेत. त्यांची कस्टडी मागण्यात आलेली आहे. तिकडचा कालावधी संपला की त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं होतं. यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या अटकेवरून सरकारवर हल्ला चढवला होता. देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी 4 मे रोजी ‘भोंगे उतरवा’ आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता.