Nagpur | मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. राजकोंडावार, अनेक क्लिनिकल ट्रॉयलमध्ये कसा उचलला महत्त्वाचा वाटा?
डॉ. गावंडे यांनी डॉ. राजकोंडावार यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षक पदाची सूत्रे प्रदान केली. डॉ. राजकोंडावार हे औषधशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक आहेत.
नागपूर : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पीएसएम विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अविनाश गावंडे यांचा वैद्यकीय अधीक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. या पदावर आता मेडिकलच्या औषधशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अतुल राजकोंडावार यांची नियुक्ती झाली. त्यांनी सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
कोण आहेत डॉ. राजकोंडावार
सोमवारी, तीन जानेवारी रोजी डॉ. गावंडे यांनी डॉ. राजकोंडावार यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षक पदाची सूत्रे प्रदान केली. डॉ. राजकोंडावार हे औषधशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी डॉ. राजकोंडावर यांच्याकडे जबाबदारी सोपविली. अनेक क्लिनिकल ट्रॉयलमध्ये डॉ. राजकोंडावार यांचा मोलाचा सहभाग असतो. आता कोरोना विरोधात लढण्याची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागणार आहे.
गावंडे यांनी 900 खाटांपर्यंत नेले संख्या
डॉ. अविनाश गावंडे यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या दोन्ही लाटादरम्यानच्या काम केले. डॉ. गावंडे यांनी वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण सुरू झाले. कोरोनाग्रस्तांसाठी 30 खाटांपासून सुरू केलेली सोय तब्बल 900 खाटांपर्यंत नेली. त्यांच्या काळात येथे अपंगांचे 21 पद्धतीचे प्रमाणपत्र आठवड्यात सहा दिवस दिले जात आहेत. सोबत अपंगांना वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी फिटनेस तपासणीची सोय, अपघाताच्या रुग्णांसाठी आपत्कालीन 20 खाटांचा विशेष वॉर्डसह इतरही अनेक सुविधा येथे उपलब्ध करण्यात आल्यात. या सर्व कामांमध्ये प्रथम मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा व ते सेवानिवृत्त झाल्यावर विद्यमान अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांची मोलाची मदत मिळाल्यानेच हे काम झाल्याचे डॉ. गावंडे यांनी सांगितले.