’68 दिवस फोन टॅप केला, मुख्यमंत्री…’, एकनाथ खडसे विधान परिषदेत कडाडले
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत आज फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केलाय.
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत आज फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केलाय. रश्मी शुक्ला यांनी 68 दिवस फोन टॅप केला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. पुणे सत्र न्यायालयाने नुकतंच फोन टॅपिंग प्रकरणी पुन्हा चौकशीचे आदेश दिल्याने रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढल्याचं मानलं जात होतं. असं असताना आज एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“रश्मी शुक्ला यांनी माझे 68 दिवस फोन टॅप केला. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. कुणाचेही फोन टॅप करणे हा प्रकार अतिशय गंभीर आहे. नियमानुसार हा प्रकार नाही. संबंधित प्रकार हा घटनाबाह्य आहे. त्यामुळे या प्रकरणावर तातडीने मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा”, अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत मांडली.
राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. संबंधित प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर वारंवार आरोप करण्यात येतायत. त्यामुळे पुणे सत्र न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली होती.
रश्मी शुक्ला यांच्यावर राज्यातील मोठमोठ्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे. आमदार आशिष देशमुख, खासदार संजय काकडे आणि एकनाथ खडसे यांच्या नावांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणावरुन विरोधकांनी त्यावेळी सत्तांधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता.