एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ‘हे’ पद घ्यावं; शिवसेनेतील या आमदारांनी केली मागणी
मंत्रिमंडळ विस्तार व्हायला हवा. सरकारला अधिक गतीने चालण्याची गरज आहे. त्यासाठी जास्त चाकं लावली गेली पाहिजे. शासनाच्या निर्णयानुसार जी संख्या मंत्र्यांची हवी ती केली गेली पाहिजे. तरच विकास जोमाने होईल.
नागपूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आता धनुष्यबाण आणि शिवसेना (Shiv Sena) पक्ष मिळालाय. त्यामुळे आता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख पद घ्यावं. हीच संपूर्ण शिवसेना आमदार, खासदारांची इच्छा आहे. अशी इच्छा शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी व्यक्त केलीय. आज होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा होईल, असंही ते म्हणाले. तर राज्य सरकारला आणखी गतीनं काम करण्याची गरज आहे. आता धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष मिळालाय. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार व्हावा. पालकमंत्र्यांची संख्या वाढावी. अशी मागणी आमदार आशिष जयस्वाल यांनी केलीय.
एकनाथ शिंदे यांनी प्रमुख पद घ्यावं
सर्वोच्च न्यायालयात जे होईल ते घटनेनुसार होईल. कोणाकडं किती आकडे हे पाहूनच निर्णय देण्यात आला आहे. इतर सकारात्मक गोष्टींसारखं हेसुद्धा सकारात्मक होईल, अशी अपेक्षा नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता काही अडचण नाही. पक्ष मिळाला, चिन्हसुद्धा मिळालं. राज्यातील जिल्ह्यांमध्ये काम करायचं आहे. त्यासाठी निर्णय घेतला गेला पाहिजे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा आहे. ते तो निर्णय घेतीलचं. गोंधळ दूर झाला. एकनाथ शिंदे यांनी प्रमुखपद घ्यावं, ही सर्वांची मागणी आहे. त्यानंतर त्यांनी आदेश द्यावेत, असंही भोंडकर यांनी सांगितलं.
तरच विकास जोमाने होणार
आशिष जयस्वाल म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार व्हायला हवा. सरकारला अधिक गतीने चालण्याची गरज आहे. त्यासाठी जास्त चाकं लावली गेली पाहिजे. शासनाच्या निर्णयानुसार जी संख्या मंत्र्यांची हवी ती केली गेली पाहिजे. तरच विकास जोमाने होईल.
मंत्रिमंडळ विस्तार ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे. सरकार ही जबाबदारी पार पाडेल. वेगवेगळ्या विभागाला मंत्री देऊन राज्यातील विकास करणे हे सरकारचं काम आहे.
बैठकीतील निर्णय आम्हाला मान्य
आजची बैठक ही पक्षाची आहे. त्यामुळे जे सिम्बालवर निवडून आलेले आमदार बैठकीत राहतील. आम्ही सरकारमधील आमदार आहोत. त्यामुळं जो निर्णय बैठकीत होईल त्याला फालो करू, असंही आशिष जयस्वाल यांनी सांगितलं.