नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी नोंदविला दुप्पट सहभाग, मनरेगातील कोणत्या योजनेत घेत आहेत पुढाकार?
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेअंतर्गत ही फळबाग लागवडीकडं शेतकऱ्यांचा कल जास्त दिसून येत आहे. फळबाग (Horticulture) लागवड करून उत्पन्नात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे या योजनेत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट सहभाग नोंदवण्यात आलाय.
नागपूर : यंदा यापूर्वी शून्य लागवड असलेल्या तालुक्यात प्रभावी काम झाले असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये उद्योग व व्यापारावर (Industry and Trade) अवलंबून असलेल्या नागरिकांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यासोबतच शेतकरी व शेतमजूर (Agricultural Labor) यांच्यासोबत उपजीविकेचा प्रश्न बिकट होता. शहरातून लोंढेच्या लोंढे गावात दाखल झाले होते. त्यावेळी या घटकांना दिलासा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरुपाच्या योजनांची कामे हाती घेतली. त्यात बांध्यावर फळबाग (Horticulture) योजनेचा समावेश होता.
33 हजार हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली
जिल्ह्यात एकूण क्षेत्रापैकी फळबागेखाली 33 हजार हेक्टर क्षेत्रावर व्यापलेले आहेत. त्यातही जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी काटोल, कळमेश्वर, सावनेर आणि नरखेड या भागातच फळबागेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत. उर्वरित 9 तालुक्यांमध्ये खूपच अल्प प्रमाणात आणि विरळ फळबाग लागवड शेतकर्यांच्या शेतावर आहे. पण, यंदा 1040 हेक्टरवर प्रथमच शेतकर्यांनी फळबाग लागवड केली आहे.
सर्वाधिक लागवड सावनेर तालुक्यात
यामध्ये सावनेर तालुक्यात सर्वाधिक 228 हेक्टरवर लागवड झाली आहे. तर पूर्वी रामटेक, मौदा, पारशिवनी तालुक्यात शुन्य लागवड होती. मात्र, वर्षभरात रामटेकमध्ये 46 हेक्टर, मौदा 50 हेक्टर, पारशिवनी 45 हेक्टरवर लागवड झाली आहे. एकंदरी जिल्ह्यात 2012-22 मध्ये सदर योजनेअंतर्गत 399 हेक्टरवर मोसंबी, 296 हेक्टरवर संत्रा, 149 हे. आंबा, 18 हेक्टरवर कागदी लिंबू, दोन हेक्टरवर शेवगा, पाच हेक्टरवर फणस, आणि तीन हेक्टरवर चिकू पिकाची लागवड झाली आहे. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी ही माहिती दिली.