नालेसफाईवरून नागरिक-कर्मचाऱ्यांमध्ये वाद, मनपा कर्मचाऱ्याच्या हाताची बोटे कापली
कर्मचाऱ्यांनी या युवकांना विरोध केला. यानंतर तीनही युवक परत गेले. मात्र ते धारधार तलवार आणि गुप्ती घेऊन कार्यस्थळी आले. कर्मचाऱ्यांना मारण्यास धावले.
नागपूर : उन्हाळ्यात नालेसफाईची कामं केली जातात. तरीसुद्धा नाल्यांची अवस्था अतिशय खराब असते. यामुळे नागरिकांमध्ये नालेसफाईवरून असंतोष आहे. ज्यांच्या घराच्या आजूबाजूला नाले आहेत त्यांना याची चांगली जाणीव आहे. त्यामुळे नाल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये नागपूर मनपाप्रती अतिशय नाराजी आहे. नालेसफाई तात्पुरती केली जाते. गंधही बाराही महिने तशीच असते, अशी नागपुरातल्या बऱ्याच नाल्यांच्या जवळची परिस्थिती आहे. यावर कोणतेही ठोस पावले उचलल्याचे दिसून येत नाही. यामुळे नाल्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये नागपूर मनपाबद्दल प्रचंड रोष आहे.
नरसाळा येथून वाहणारा नाला दोन दिवसांपूर्वी साफ करण्यात आला. पण, त्याची अवस्था अजूनही अतिशय खराब आहे. सध्या नगरसेवक नसल्याने मनपा कर्मचारी हेच स्वतःला मालक असल्याच्या आविर्भावात वागतात, असा नाल्याच्या शेजारी असणाऱ्या लोकांचा आक्षेप आहे. यातून हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
तीन युवकांना अटक
पावसाळी नाल्यांची सफाई करणाऱ्या मनपाच्या दोन कर्मचाऱ्यांवर तीन युवकांनी तलवार आणि गुप्तीद्वारे हल्ला करून जखमी केले. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन आरोपी तीन युवकांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी दिली.
तलवार आणि गुप्ती घेऊन आले
शनिवारी (ता. १७) धरमपेठ झोन अंतर्गत हिल रोड यशवंत स्टेडियम येथे झोनच्या लोककर्म विभागाचे श्री. सातपुते आणि आरोग्य विभागाचे विक्रम चव्हाण हे जेसीबीच्या माध्यमातून पावसाळी नाली सफाई करीत होते. दुपारी २ वाजता दरम्यान सदर ठिकाणी तीन युवक दारू पिऊन आले. त्यांनी काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. कर्मचाऱ्यांनी या युवकांना विरोध केला. यानंतर तीनही युवक परत गेले. मात्र ते धारधार तलवार आणि गुप्ती घेऊन कार्यस्थळी आले. कर्मचाऱ्यांना मारण्यास धावले.
युवकांच्या हल्ल्यातून बचाव करीत असताना श्री. सातपुते यांच्या हाताची बोटे कापली गेली. तर विक्रम चव्हाण यांच्या डाव्या हाताला मार लागला. दोन्ही कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. सदर घटनेची माहिती देत तक्रार नोंदविली. पोलीस विभागामार्फत तीनही युवकांना अटक करण्यात आली असल्याचेही सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी सांगितले.