Nagpur Crime | चोरी करून पळाला, प्रेयसीच्या होता संपर्कात; तिने केली पोलिसांना मदत आणि…
तीनं धर्मेंद्रला जबलपूर बसस्थानकावर भेटण्यासाठी बोलाविले. प्रेयसीच्या सांगण्यावरून तो तिला भेटण्यासाठी बसस्थानकावर आला. तेथे इमामवाडा पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. धर्मेंद्र येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
नागपूर : सुरक्षा रक्षकानं पेट्रोल पंपवरून चोरी केली. त्यानंतर तो जबलपूरच्या दिशेनं पळाला. पोलिसांना तो एका नंबरवर नेहमी बोलत असल्याच लक्षात आलं. त्यांनी शोध घेतला असता ती त्याची प्रेयसी निघाली. तिच्याच मदतीनं चोरट्याला इमामवाडा पोलिसांनी जबलपुरात बेळ्या ठोकल्या.
रक्कम केली लंपास
सिरसपेठेतील धर्मेंद्र मिश्रा (वय 30 वर्षे ) मेडिकल चौकातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर सुरक्षारक्षक होता. तसा तो मूळचा रिवा येथील रहिवासी. पंपचे व्यवस्थापक विनय कडवे यांना त्याची वागणूक चांगली दिसली नाही. त्यामुळं कडवे यांनी धर्मेंद्रचा मंगळवारी सकाळी 9 वाजता हिशेब केला. त्याला नोकरीवरून काढून टाकले. त्यानंतर कडवे हे कामानिमित्त ऑफिसच्या बाहेर गेले. या संधीचा फायदा घेत धर्मेंद्रने ड्राव्हरमध्ये ठेवलेली रोख रक्कम लंपास केली.
तो नंबर निघाला प्रेयसीचा
ही चोरीची रक्कम 93 हजार रुपये होती. ही बाब लक्षात येताच सीसीटीव्ही रेकॉर्डिंग चेक करण्यात आले. त्यामध्ये धर्मेंद्र चोरी करताना आढळून आला. पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रेसिंगवर टाकून तपास सुरू केला. तो वेळोवेळी मोबाईलचे सीम बदलवित होता. त्याचे लोकेशन जबलपूर शहरच दाखवित होते. तो नेहमी एकाच नंबरवर बोलत होता. पोलिसांनी त्या नंबरची माहिती मिळविली. तो नंबर त्याच्या प्रेयसीचा असल्याचे निष्पन्न झाले.
प्रेयसीला भेटायला आला नि अडकला
पोलिसांनी धर्मेंद्रच्या प्रेयसीसोबत संपर्क साधला. तिला धर्मेंद्र चोरी करून पळाल्याचे सांगितले. फरार होण्यात त्याची मदत केल्याच्या आरोपात तिच्यावरही कारवाई होऊ शकते, असा धाक दाखविला. त्यामुळं तिने पोलिसांना सहकार्य केलं. तीनं धर्मेंद्रला जबलपूर बसस्थानकावर भेटण्यासाठी बोलाविले. प्रेयसीच्या सांगण्यावरून तो तिला भेटण्यासाठी बसस्थानकावर आला. तेथे इमामवाडा पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. धर्मेंद्र येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई झोन 4 चे डीसीपी नुरुल हसन, एसीपी डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनात पोली निरीक्षक राजेंद्रकुमार सानन यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक ठाकरे, सुभाष ठाकरे, परमेश्वर कडू, रवींद्र राऊत, अमित पात्रे यांनी केली.