हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच पक्का… काल सासूरवाडीत, आज मुंबईपासून नागपूरपर्यंत बॅनरबाजी; संकेत काय?

| Updated on: Apr 26, 2023 | 11:18 AM

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या जोरदार चर्चेत आहेत. मुंबई पासून ते नागपूरपर्यंत अजित पवार यांचे बॅनर्स लागले आहेत. त्यावर भावी मुख्यमंत्री असं लिहिलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाही रंगल्या आहेत.

हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच पक्का... काल सासूरवाडीत, आज मुंबईपासून नागपूरपर्यंत बॅनरबाजी; संकेत काय?
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची जोरदार चर्चा सुरू आहे. अजितदादा हेच भावी मुख्यमंत्री असल्याचं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तशी पोस्टर्सही लावली जात आहेत. काल अजित पवार यांची सासूरवाडी असलेल्या धाराशीव येथे ही बॅनर्स लागली होती. त्यामुळे अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदावरून जोरदार चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच मुंबईत आणि नागपुरातही अजितदादाच भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा रंगली आहे. अजितदादा यांचे सातत्याने बॅनर्स लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

राज्याच्या उपराजधानीत म्हणजे नागपुरातही लागले अजितदादा ‘भावी मुख्यमंत्री’चे होर्डिंग्ज लागले आहेत. ‘वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाचं पक्का’ असं या होर्डिंगवर लिहिलं आहे. ‘अजितदादा भावी मुख्यमंत्र्यांच्या’ या होर्डिंग्जवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी हे होर्डिंग्ज लावल्यांची माहिती आहे. अजितदादांच्या भाजप प्रवेशाच्या राजकीय चर्चेवर नागपुरात बोलके होर्डिंग्ज लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नागपूरातील लक्ष्मीभवन चौक आणि इतर परिसरात हे होर्डिंग्ज लागले आहेत.

हे सुद्धा वाचा

अजित पवार हे मुख्यमंत्री झाले तर…?

नागपूरप्रमाणेच मुंबईतही अजितदादा भावी मुख्यमंत्री असे लिहिलेले बॅनर्स झळकले आहेत. आज मुंबईतील चेंबूरमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा आहे. ‘युवा मंथन… वेध भविष्याचा’ या विषयावर यावेळी मंथन होणार आहे. अजित पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने नवी मुंबई ते चेंबूर आंबेडकर कॉलेजपर्यंत ‘अजित पवार मुख्यमंत्री झाले तर…’ अशा आशयाचे बॅनर्स आणि पोस्टरबाजी करण्यात आली आहे. अॅडव्होकेट निलेश भोसले आणि नितीन देशमुख यांनी हे बॅनर्स लावले आहेत. बॅनर्स लावून अजित पवार हे मुख्यमंत्री झाले तर…? असा सवाल जनतेला विचारण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनर्सची सध्या चेंबूर परिसरात जोरदार चर्चा आहे.

शरद पवार यांची हजेरी

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. एका मुलाखतीत बोलताना अजित पवारांनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांसोबतच अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून राज्यभरात अजित पवारांचे पोस्टर्स लावून दादांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त करायला सुरुवात केलीये.