नागपूर : नागपूर जिल्हा परिषदचे (Nagpur Z.P) माजी अध्यक्ष तथा माजी सभापती म्हाडा नागपूर व दि जनसेवक शिक्षण संस्था रिधोराचे संस्थापक सचिव विठ्ठलराव टालाटुले (Vitthalrao Talatule) यांचे रविवारी 16 रविवारला वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्म गाव रिधोरा (ता. काटोल) येथे सोमवारी 17 जानेवारीला सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. समाजासाठी अनेक सामाजिक कार्य त्यांनी निरंतर केले. त्यांच्या निधनामुळे सर्वसमान्यांचा उत्तम नेता हरपला आहे. साधा स्वभाव, नेहमी चेहऱ्यावर हास्य, प्रत्येकाला आपला वाटणारा निर्मळ मनाचा नेता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल टालाटुले यांच्या निधनाने गोरगरीब, सर्वसामान्यांना समर्पित नेतृत्व हरपले.
काटोल तालुक्यातील रिधोरा येथील सर्वसामान्य कुटुंबातील विठ्ठल टालाटुले यांनी अथक संघर्ष केले. समाजकारण आणि राजकारणामध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले होते. वंचित, अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांचा स्वभाव साधा असला तरी हाती घेतलेले काम समाजोपयोगी असेल तर त्यासाठी सदैव संघर्ष करण्याची त्यांची तयारी होती. पदाचा हव्यास त्यांनी कधीच केला नाही. सोपविलेली पदे व जबाबदारी निष्ठेने पार पाडली. त्यांच्या निधनाने तयार झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. ते एक व्यक्ती म्हणून मनमिळाऊ तसेच सेवाभावी वृत्ती, निष्कलंक व्यक्तिमत्त्व होते. पक्षाविरहित काम करण्याचा त्यांनी सदोदित प्रयत्न केला. अजातशत्रू म्हणून ते सर्वसामान्यांमध्ये वावरले. त्यांच्या निधनाने वंचित, गोरगरीब, शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे.