Nagpur Corona | आधी दहावीची विद्यार्थिनी, आता अकरावीची कोरोनाबाधित, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण, शाळा सुरू राहणार?
या मुलीला गेल्या आठवड्यात कोरोनासदृश लक्षणे होती. पण, शाळेत परीक्षा सुरू असल्यानं तीनं चाचणी केली नव्हती. मात्र, शनिवारी तिला बाहेरगावी जायचे असल्यानं शुक्रवारी कोविडची चाचणी केली. त्यात तिचा अहवाल सकारात्मक आढळला.
नागपूर : शहरातला ओमिक्रॉनचा रुग्ण बरा झाला असला, तरी कोरोनाची भीती अद्याप कायम आहे. शाळा सुरू झाल्यात. पण, विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आता शाळा बंद करण्याची वेळ येणार का, असा संभ्रम निर्माण होत आहे.
शनिवारी (ता. 18) दाभा येथील सेंटर पॉइंट शाळेतील एका विद्यार्थिनीला कोरोनाची बाधा झाली. ही विद्यार्थिनी 16 वर्षांची आहे. शहरातील वर्धा मार्गावर वास्तव्यास राहते. ती दाभा येथील सेंटर पॉइंट शाळेच्या इयत्ता 11 वीमध्ये शिक्षण घेते. या मुलीला गेल्या आठवड्यात कोरोनासदृश लक्षणे होती. पण, शाळेत परीक्षा सुरू असल्यानं तीनं चाचणी केली नव्हती. मात्र, शनिवारी तिला बाहेरगावी जायचे असल्यानं शुक्रवारी कोविडची चाचणी केली. त्यात तिचा अहवाल सकारात्मक आढळला.
मुलीच्या संपर्कातील विद्यार्थ्यांची चाचणी
मुलीच्या संपर्कातील तिच्या आईचीही कोविड चाचणी करण्यात आली आहे. महापालिकेकडून शाळा व्यवस्थापन समितीला शाळेचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय महापालिकेकडून त्या विद्यार्थिनीच्या संपर्कातील इतर विद्यार्थ्यांचेही कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी सांगितले.
यापूर्वी डीपीएसची विद्यार्थिनी कोरोनाबाधित
कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉन हा जगभरात थैमान घालत असल्याचे चित्र आहे. परंतु यानंतरही नागपूर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती जवळपास चांगलीच आटोक्यात असल्याचे वास्तव आहे. मात्र, शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होत असल्याचे प्रकार दररोज पुढे येत आहे. त्यामुळं पालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी कामठी मार्गावरील डीपीएसची विद्यार्थिनी कोरोनाबाधित आढळून आली होती. त्यानंतर ही दुसरी घटना समोर आली आहे.
सध्या 46 रुग्ण बाधित
कोरोना नियंत्रणात येताच टप्प्याटप्प्यानं शाळा सुरू झाल्या. 15 डिसेंबरपासून एक ते सातच्या मनपा हद्दीतील शाळाही सुरू झाल्या. पण, आता विद्यार्थीच बाधित सापडत असल्यानं चिंता अधिकच वाढली आहे. शनिवारी 3,684 तपासण्या करण्यात आल्या. यातून फक्त एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडला. 11 डिसेंबरपूर्वी नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 68 झाली होती. पण, 12 ते 18 डिसेंबरच्या दरम्यान रुग्णसंख्येत घट झाली. सध्या कोरोनाचे 46 रुग्ण बाधित आहेत.