Agrovision | नागपुरात आजपासून शेतकऱ्यांची पंढरी! चार दिवस अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन, जाणून घ्या कृषीतील आधुनिक तंत्रज्ञान
यंदा या प्रदर्शनात २५ हून अधिक कृषी विषयांवर नामांकित तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शेतकर्यांसाठी विविध कार्यशाळा, विदर्भात दुग्ध व्यवसायाच्या संधी, विदर्भात गोड्यापाण्यातील मत्स्यव्यवसाय, कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान व मूल्यवर्धन आदी विषयांवर परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले आहे.
नागपूर : शहरातील रेशीमबाग मैदानात आजपासून चार दिवस कृषी क्षेत्रातील पंढरी अवतरणार आहे. 24 ते 27 डिसेंबरपर्यंत अॅग्रोव्हिजन (Agrovision) कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे (agricultural exhibition) उद्घाटन शुक्रवारी सकाळी 11 वाजता रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे पार पडणार आहे.
केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्या हस्ते उद्घाटन
अॅग्रोव्हिजन फाउंडेशन व एमएम अॅक्टीव यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी क्षेत्राच्या समृद्धीसाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. यंदाचं कृषी प्रदर्शनाचं बारावं वर्ष आहे. अध्यक्षस्थानी अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी राहतील. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे उद्घाटन करतील. याप्रसंगी कर्नाटकचे उच्च शिक्षण, जैव, तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. अश्वथनारायण सी.एन, आ. चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहे.
अॅग्रीकल्चर ड्रोन
डिझेलच्या वाढत्या किमती व त्यामुळं निर्माण होणारे प्रदूषण हा काळजीचा मुद्दा आहे. हे टाळण्यासाठी बायोसीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर वरदान ठरणार आहे. याचे प्रात्यक्षिक यंदाच्या अॅग्रोव्हिजनमध्ये पहायला मिळणार आहे. याशिवाय अॅग्रीकल्चर ड्रोनही या कृषी प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार असल्याचं अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.
सेंसर टेक्नॉलॉजी विकसित
पिकांना पाणी देण्यासाठी सेंसर टेक्नॉलॉजी विकसित करण्यात आली आहे. त्याचेही प्रात्यक्षिक येथे बघायला मिळणार आहे. कृषी क्षेत्रातील निर्माते, डिलर्स, डिस्ट्रीब्यूटर्स, उद्योजक आणि शेतकरी यांनी अशाप्रकारे कोणतीही नवकल्पना त्यांच्याकडे असल्यास ती अॅग्रोव्हिजनच्या बॅंक ऑफ आयडियाज अॅण्ड इनोव्हेशनकडे पाठवावी, अशी सूचनाही गडकरींनी केली आहे.
दूध व्यवसायातील संधींवर परिषद
विदर्भाच्या डेअरी उद्योगाला चालना देण्यासाठी विदर्भातील दूध व्यवसायाच्या संधी या विषयावर एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय विदर्भातील शेतमाल निर्यातीच्या संधी व गोड्यापाण्यातील मत्स्य शेतीच्या संधी या विषयावरही परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत.