राज्यातील 80 टक्के बांबू लागवड एकट्या गडचिरोलीत, युनिट उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढं यावं – सुरेश राठी
राज्य सरकारनं बांबू लागवडीवर देखरेख करण्यासाठी मंडळाची स्थापना केली आहे. त्यात पुरक आहार आणि शेतजमिनीवरील वृक्षारोपणावर भर देण्यात आला आहे. उद्योगाच्या दर्जेदार मालाची उपलब्धता व्हावी, यासाठी सरकारनं धोरण निश्चित केलंय, असेही सुरेश राठी यांनी सांगितलं.
नागपूर : महाराष्ट्रात जेवढी बांबू लागवड होते, त्याचा 80 टक्के बांबूची लागवड एकट्या गडचिरोली जिल्ह्यात होते. बांबू मंडळाच्या मदतीनं पाच-दहा उद्योजकांनी पुढं येऊन त्यांचे युनिट स्थापन करावेत, अशी माहिती व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी यांनी दिली. बांबू क्षेत्रातील औद्योगिक संधी, या विषयावरील कार्यशाळेत ते काल बोलत होते. एमएसएमई फोरम ऑफ विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आणि महाराष्ट्र बांबू विकास मंडळातर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
राज्य सरकारनं बांबू लागवडीवर देखरेख करण्यासाठी मंडळाची स्थापना केली आहे. त्यात पुरक आहार आणि शेतजमिनीवरील वृक्षारोपणावर भर देण्यात आला आहे. उद्योगाच्या दर्जेदार मालाची उपलब्धता व्हावी, यासाठी सरकारनं धोरण निश्चित केलंय, असेही सुरेश राठी यांनी सांगितलं.
अगरबत्ती निर्मितीसाठी तीन प्रजाती
गडचिरोलीसह पूर्व विदर्भात निर्माण होणारा सागवान हा सर्वोत्तम आहे. या प्रजातीच्या जातीही राज्य बांबू विकास महामंडळाकडे उपलब्ध आहेत. मंडळाने अगरबत्तीच्या निर्मितीसाठी बांबूच्या तीन प्रजाती शोधल्या आहेत, अशी माहिती राज्य बांबू विकास महामंडळाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि व्यवस्थापकीय संचालक एस. श्रीनिवास राव यांनी कार्यशाळेत दिली.
कार्यशाळेत व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी, सहसचिव अनिता राव, एन्सेफॅलॉन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक के. साथियानाथन, रामनिवास पांडे, व्हीआयएचे उपाध्यक्ष सुहास बुद्धे, गिरीश देवधर आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीनिवास राव म्हणाले, बांबू उत्पादकांसाठी खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या सुविधांसाठी एक ई-प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. सहसचिव अनिता राव, एन्सेफॅलॉन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक के. साथियानाथन यांची भाषणे झाली.
बहुउपयोगी बांबू
बांबू हा विविध उपयोगासाठी वापरला जातो. बांबूपासून खुर्ची, टेबल बनविले जातात. बांबूपासून बनविण्यात येणारी घरी ही थंड असतात. बांबूचे वास्ते हे अन्नपदार्थ म्हणून खाल्ले जातात. शिवाय बांबूपासून मशरूमसुद्धा मिळतात. शेतकरी उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत म्हणून बांबूकडं पाहतो, अशी माहिती कार्यशाळेत देण्यात आली.