महापारेषणचे अध्यक्ष दिनेश वाघमारेंना ग्रीनटेक लीडिंग डायरेक्टर पुरस्कार; ऊर्जामंत्री राऊतांकडून अभिनंदन
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांना नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फौंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठेचा 'ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अवॉर्ड-2021' हा अलिकडेच प्रदान करण्यात आला
नागपूर : डिजिटल तंत्रज्ञानासाठी स्कॉच सुवर्ण पुरस्कार जिंकणाऱ्या महापारेषणच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांना नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फौंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अवॉर्ड-2021’ हा अलिकडेच प्रदान करण्यात आला. (Greentech Leading Director Award to Mahapareshan’s Dinesh Waghmare, Nitin Raut Congratulates)
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार डॉ. फारूक अब्दुला यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गमध्ये अलीकडेच झालेल्या ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर परिषदेत हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिनेश वाघमारे यांचे अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे कंपनीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी जम्मू आणि काश्मीरचे माजी पर्यावरण व वनसंपदामंत्री मिया अल्ताफ अहमद, ग्रीनटेक फाऊंडेशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी कमलेश्वर शरण, महापारेषणचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) (प्रभारी) सुगत गमरे, वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता नसीर कादरी उपस्थित होते.
कंपन्यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी व उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. सांघिक व्यवस्थापन आणि कंपनीच्या शाश्वत व निरंतर प्रगतीसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाचा या पुरस्काराने गौरव केला जातो.
वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली महापारेषणने रेकॉर्डब्रेक 25 हजार 800 मेगावॅट विजेचे विनाअडथळा पारेषण केले. निसर्ग व तौक्ते चक्रीवादळाने खंडित झालेला वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत केला. 12 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबई परिसरात अंशतः ग्रीड फेल्युअरमुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत केला. कोरोना काळातही कोविड रूग्णालये, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचा वीजपुरवठा चालू ठेवला. उपकेंद्रांचे डिजिटायझेशन आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. त्या उपक्रमाला स्कॉच अवॉर्ड मिळाला.
महापारेषणमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक स्वयंचलित प्रकल्प हाती घेतले आहेत. वाहिनीच्या देखभाल व दुरूस्तीची कामे लवकर होण्यासाठी ड्रोनच्या वापराची कल्पनाही त्यांचीच आहे. जीआयएस, मॉड्युलर जीआयएस, एचटीएलएस कंडक्टरचा वापर महापारेषणच्या अनेक प्रकल्पात होत आहे. त्यामुळे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे. महापारेषणच्या सीएसआर फंडातून अनेक लोकोपयोगी कामे करण्यात आली आहेत.
वाघमारे यांच्या कुशल नेतृत्वाखाली राज्य भार प्रेषण केंद्र, संचलन व सुव्यवस्था आणि प्रकल्प वेळेत पूर्ण झाले आहेत. महापारेषण कंपनीने जॅाईंट व्हेंचर उपक्रमाद्वारे अति उच्च दाब वाहिन्यांच्या मनोऱ्यावर ओपीजीडब्ल्यू (ऑप्टिकल ग्राउंड वायर) नेटवर्क प्रस्थापित केले आहे. सध्या ते ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.
इतर बातम्या
उत्तर भारतीयांना ओबीसीत आरक्षणाला भाजपचा विरोध?, बावनकुळेंचं मोठं विधान; राजकीय आखाडा तापणार
VIDEO: हजारो लोकांसमोर आयुष्यात पहिल्यांदाच भाषण दिलं, नंतर काय घडलं?; राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
(Greentech Leading Director Award to Mahapareshan’s Dinesh Waghmare, Nitin Raut Congratulates)