Nagpur | पाण्यासाठी करावी लागते धावाधाव; मनपाने काय केली व्यवस्था जाणून घ्या
डायड्रंट झाल्यास गरजेनुसार अग्निशमन बंबांना पाणी उपलब्ध होईल. त्यामुळं होणारे नुकसान कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागपूर : एखादी आगीची घटना घडल्यास अग्निशमन बंबाला पाणी भरण्याकरिता धावाधाव करावी लागते. पण, ही धावाधाव आता संपणार आहे. नागपूर शहराच्या 116 महत्त्वपूर्ण ठिकाणी लवकरच हायड्रंट लावण्यात येणार आहेत. यामुळं आगीची घटना घडलेल्या ठिकाणीही जवळील हायड्रंटमधून पाणी भरणे शक्य होईल. शहर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातूनही हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.
116 ठिकाणी हायड्रंट बसविण्याचा प्रस्ताव
महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यासाठी 99 लाखांवर खर्च अपेक्षित आहे. यापूर्वीदेखील याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीकडून मंजूर करण्यात आले. 1947 मध्ये नागपूर शहरात जवळपास महत्त्वपूर्ण ठिकाणी एक हजारांवर हायड्रंट बसविण्यात आले होते. त्या काळात या हायड्रंटवर 24 तास पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली होती. शहरात आगीची घटना घडल्यास अग्निशमन बंबांना पाणी भरणे सोयीस्कर व्हात असे. यातून मोठ्या आगीच्या घटनांवरही लवकर नियंत्रण मिळविले जात होते. यातून मोठे नुकसान वाचविणे शक्य होत होते. पण, ब्रिटिशांचा हा वारसा महापालिकेने सांभाळला नाही. आता शहरात 116 ठिकाणी हायड्रंट बसविण्याचा प्रस्ताव पारित केलाय. हायड्रंटचे महत्त्व माहिती असतानाही महापालिका याबाबत कृती करू शकली नाही.
शहरात उरले फक्त 9 हायड्रंट
शहरात आता केवळ 9 हायड्रंट उरले आहेत. कस्तूरचंद पार्कजवळील सेंट जोसेफ शाळा, रेल्वेस्टेशनलगत, विधान भवनाजवळ, महापालिकेच्या सदर हॉस्पिटलच्या बाहेर, रविभवन परिसर, टिळकनगर, इंदिरा गांधी रुग्णालय आणि काचीपुरा चौक (रामदासपेठ) आदी ठिकाणी हे हायड्रंट आहेत. अग्निशमन व जलप्रदाय विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून हायड्रंटसाठी 116 ठिकाणे निश्चित केली होती. वेळोवेळी निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. याकडेही महापालिकेने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. डायड्रंट झाल्यास गरजेनुसार अग्निशमन बंबांना पाणी उपलब्ध होईल. त्यामुळं होणारे नुकसान कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.