Vidarbha Temperature | विदर्भात उष्णतेची लाट, नागपूरचा पारा 44.8 अंशावर; उन्हाळा पक्ष्यांच्या जीवावर
अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात 28 ते 30 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. बुधवारचा दिवस ब्रम्हपुरीसाठी सर्वाधित तापमानाचा ठरला. 45.1 अंश तापमानाची नोंद झाली.
नागपूर : नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट आलीय. नागपूरचा पारा 44.8 अंशावर पोहचलाय. यंदाचा उन्हाळा पक्ष्यांच्या जीवावर उठतोय. नागपुरात वाढत्या तापमानाचा पक्ष्यांना उष्माघात (Birds Heatstroke) झालाय. 100 पेक्षा जास्त पक्ष्यांवर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये (Transit Treatment Center) उपचार सुरू आहेत. वाढलेल्या तापमानामुळे पक्ष्यांची शक्ती कमी होत आहे. प्राण्यांमध्ये उष्माघातासारखा (Heatstroke) त्रास वाढलाय. नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दररोज सात ते आठ पक्षी उपचारासाठी येतात. पाळीव आणि जंगली प्राण्यांनाही उच्च तापमानाचा फटका बसतोय. भटकी जनावरे, श्वान, माकड आणि पक्षीही उष्माघाताचे शिकार होताहेत. उष्णतेमुळे सध्या पक्ष्यांना यांना मोठ्या प्रमाणावर अतिसाराची समस्या सुरू झालीय. खार, कोतवाल, चिमण्यासह इतरही पक्ष्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झालेत.
विदर्भात पारा भडकला
अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात 28 ते 30 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. बुधवारचा दिवस ब्रम्हपुरीसाठी सर्वाधित तापमानाचा ठरला. 45.1 अंश तापमानाची नोंद झाली. वर्ध्यात 45 अंश सेल्सिअस, तर नागपुरात 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदा प्रथमच नागपूरचे तापमान 44.5 अंशांच्या पुढं गेलंय. चंद्रपूर 44.6, तर अकोल्यात 44.7 अंश तापमान नोंदविले गेले. गोंदियात 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
रुग्णवाहिका चालकानं पोपटास पाजले पाणी
वाशिमहून रुग्ण घेऊन अकोल्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना रुग्णवाहिकेच्या समोर अचानक एक पोपट आला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून रुग्णवाहिका थांबवली. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आपण मुक्या पक्ष्यांचा तर जीव घेतला नाही ना ही भावना प्रारंभी त्यांच्या मनात आली. पोपट जखमी झाला का हे पाहण्यासाठी रुग्णवाहिकेतील चालक आणि डॉक्टर भर उन्हात बाहेर आले. गाडीखाली आलेल्या पोपटाला त्यांनी सुखरूप बाहेर काढले. एखाद्या रुग्णाप्रमाणे पोपटाची तपासणी केली. पाणी पाजले, रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाच्या निंबोळ्या खायला देऊन थोड्या वेळाने त्या मुक्या जिवाला शेजारील लिंबाच्या झाडावर सोडून दिले.