नागपूर : बुटीबोरीतील महिलेचा मृतदेह अमरावतीत सापडला. पती-पत्नीत वाद झाल्यानं ती अमरावतीला दोन चिमुकल्यांसोबत गेली होती. अमरावतीच्या शिवाजी कृषी महाविद्यालय परिसरात 32 वर्षीय महिलेचा मृतदेह दिसला. आईच्या मृतदेहाला १० महिन्यांची चिमुकली बिलगली होती. बाजूला चार वर्षांचा मुलगा रडत बसला होता. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
शुक्रवारची वेळ सकाळी आठची. 10 महिन्यांची केतकी आपल्या आईच्या मृतदेहाला बिलगून धाय मोकलून रडत होती. हा रडण्याचा आवाज महाविद्यालयाच्या चौकीदाराला आला. बाजूलाच रुद्र नावाचा चार वर्षांचा मुलगाही होता.
मृतदेह पाहताच चौकीदारानं महाविद्यालयाच्या अधीक्षकांना कळवलं. प्रभारी अधीक्षक संजय गडलिंग यांनी याची तक्रार शुक्रवारी दुपारी पोलिसांत केली. त्याठिकाणी पाहिले तर काय तनुश्री सागर करलुके ( वय 32) ही महिला मृतावस्थेत होती. ही महिला नागपूर जिल्ह्यातल्या बुटीबोरी तालुक्यातली असल्याचं समजलं. बुटीबोरी पोलिसांत तनुश्री करलुके ही बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आलीय.
मृतदेहाची ओळख पटविण्यात आली आहे. ती महिला बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुईखैरीची आहे. तिच्याबाबात बुटीबोरी पोलिसांना कळविण्यात आले. तीनं आत्महत्या केली की, तिची हत्या करण्यात आली. याबद्दल शवविच्छेदन अहवालानंतरच कळेल, असं सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांनी सांगितलं.
महाविद्यालयाच्या इमारतीच्या टेरेसवर या महिलेची पर्स आढळली. टेरेसवर काही खाण्याच्या वस्तूही दिसल्या. रुद्र नावाच्या चार वर्षांच्या मुलाही ही बाब पोलिसांना सांगितली. त्याला आई बोलत नाही, येवढेच समजत होते. उपायुक्त एम. एम. मकानदार, पूनम पाटील, गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी घटनास्थळी पोहचून चौकशी केली.