नागपूर : येत्या 2024मध्ये आघाडी म्हणून लढू की नाही हे आताच कसं सांगू? असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. शरद पवार यांचा हा इशारा कुणाला? असा सवालही केला जात होता. पवार यांच्या विधानावरून आघाडीत बिघाडी असल्याची चर्चाही रंगली होती. पण खुद्द शरद पवार यांनीच आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं म्हटलं आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला. मात्र, ही चर्चा पुरती थांबलेली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकासा आघाडीत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा आमचा मानस आहे. पण आघाडी नाही झाली तर आमचे सर्व प्लॅन तयार आहेत, असं नाना पटोले म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले टीव्ही9 मराठीशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचा दुसरा प्लॅन तयार असल्याचं सांगून महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे पटोले यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत. त्यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री जनता ठरवते. आम्ही त्यावर भाष्य करणं योग्य नाही. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आज निवडणुका नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्रीदावर चर्चा करण्याचं कारण नाही. जेव्हा निवडणुका येतील तेव्हा चर्चा होईल. ज्या पक्षाचे आमदार सर्वाधिक निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल, असं नाना पटोले म्हणाले.
महाराष्ट्रात चुकून लोकांनी भाजपला 105 आमदार दिले. महाराष्ट्रात कधी नव्हे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे आमदार निवडून देणं जनतेची चूक होती. संख्या बळाच्या आधारावर प्यादे चालवण्याचं काम भाजप करत आहे. मात्र हे अधिक काळ चालणार नाही, असं पटोले यांनी सांगितलं.
राज्यातील सरकार असंवैधानिक आहे. गेल्या वर्षभरात राज्यात गंमतजंमत सुरू आहे. हे सगळं राज्याला लाजवणारं आहे. सीरियस सरकार नाही. जनतेची तिजोरी लुटणारं सरकार आहे. खारघरचं प्रकरण भयानक होतं. उन्हात तळफडत लोकांना मारलं. महाराष्ट्राच्या इतिहासातील काळीमा फासणारी घटना आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी खारघर प्रकरणावर दिली.
कर्नाटक निवडणुकीनंतर राज्यात राहुल गांधी यांच्या सात सभा होणार आहेत. मुंबईत राहुल गांधी यांची सभा होणार आहे. प्रियंका आणि राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात सभा होतील, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
कर्नाटकातील निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. मागच्या काळात निवडणुका झाल्या, त्यातही जनतेने काँग्रेसलाच सत्ता दिली होती. पण मोदी-शाहांनी जनतेचा कौल तोडून सरकार स्थापन केलं होतं. कर्नाटकातील जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात राग आहे. भाजपच्या उमेदवारांना गावातून हाकलून लावले जात आहे. तानाशाहाच्या विरोधातील हा उद्रेक आहे. काँग्रेसच हा देशातील जनतेला पर्याय आहे. देश उभा करण्याचं काम काँग्रेसने केलं. देशाचं संविधान सांभाळण्याचं काम केलं आहे. पोलच्या आकडेवारीपेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील, असा दावा त्यांनी केला.