दिवस मावळायच्या आत घरी परता, हवामान खात्याचा विदर्भासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट; आणखी इशारा काय?
गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे विदर्भातील पिकांना नवसंजीवनी मिळाली असून बळीराजा सुखावला आहे. तसेच विदर्भातील दोन धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.
नागपूर | 16 सप्टेंबर 2023 : गेल्या महिना दीड महिन्यापासून विदर्भात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे विदर्भवासियांचे टेन्शन वाढलेले असतानाच विदर्भात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने पिकांनाही संजीवनी मिळाली आहे. तर धरण क्षेत्रातही पावसाने चांगलाच जोर धरल्याने विदर्भातील दोन धरणे ओव्हर फ्लो झाले आहेत. याशिवाय नद्यांनाही पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय विदर्भात येत्या काही दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही हवामान विभागाने दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसात धरणक्षेत्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसाने संततधार लावून धरल्याने नागपूर जिल्ह्यातील पेंच तोतलाडोह आणि नवेगाव खैरी ही धरणे 100 टक्के भरली आहेत. तोतलाडोह धरणाचे 14 पैकी 10 दरवाजे 0.4 मीटरने उघडले आहेत. तर नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी धरणाचे सर्व 16 दरवाजे 0.3 मीटरने उघडले आहेत. नवेगाव खैरी धरणातून 500 क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
नदी शेजारील गावांना इशारा
नवेगा खैरी धरणातून पेंच नदीत पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे नदीशेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील मध्यम आणि लघू प्रकल्पांची धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली असून त्या धरणांमधूनही नदीत पाणी सोडण्यात येत आहे. पेंच, कन्हाण, कोलार, नांद नदी तर नागपूर शहरातील नाग, पिवळी, आणि पोहरा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे या सर्व नदी शेजारी वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्टचा इशारा
विदर्भात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तसेच पाण्याचा प्रश्नही सुटण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला पाऊस थांबताना दिसत नाहीये. तसेच विदर्भात आणखी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासह विदर्भात अतिवृष्टी, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घ्यावी लागणार आहे.
तीन दिवसांपासून धो धो
गेल्या तीन दिवसांपासून विदर्भाच्या बऱ्याच भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धरणं जवळपास पूर्ण क्षमतेने भरली असून धरणांमधूनही नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यानुसार नदी आणि धरणाच्या काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात देण्यात आला आहे.