Nagpur | वाद श्रेय कुणाचे यावरून! खंडाळ्यात सरपंच-आरोग्य कर्मचाऱ्यांत जुंपली; का व्हावं लागलं सरपंचाला गडाआड?
नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतचे सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रुपेश मुंदाफळे यांनी आरोग्य निरीक्षकाला मारहाण केली.
नागपूर : खंडाळाचे सरपंच रुपेश मुंदाफले हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. ग्रामपंचायतला सूचना न देता कोविड लसीकरण शाळेत घेतल्यानं त्यांनी गोंधळ घातला. तसेच आरोग्य सेविकाला शिवीगाळ करण्यात आली. आरोग्य निरीक्षण प्रवीण धोटे आणि आरोग्य विभागाचा वाहन चालक नितेश रेवतकर यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सरपंच रुपेश मुंदाफले याला अटक करण्यात आली.
आरोग्य सेविकेला शिवीगाळ
भिष्णूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मंगळवारी खंडाळा येथे कोविड लसीकरण आयोजित केले होते. याबाबत ग्रामपंचायतला सूचना देऊन गावात दवंडी देण्यात आली. यापूर्वी गावात जिल्हा परिषद शाळा किंवा अंगणवाडीमध्ये लसीकरण करण्यात येत होते. 15 ते 18 वर्षे वयाचे लसीकरण करण्याकरिता आरोग्य विभागातर्फे गावातील हायस्कूलमध्ये लसीकरण सुरू असताना रूपेश मुंदाफळे तेथे आले. कोणाच्या परवानगीने लसीकरण करीत आहात, अशी विचारणा केली. आरोग्यसेविका सविता गजभिये यांना शिवीगाळ करणे सुरू केले. शाळेतील कर्मचार्यांनी आरोग्यसेविकेला संरक्षण देत एका खोलीत सुरक्षित ठेवले.
वाहनचालकालाही मारहाण
दरम्यान, तिथे आलेले आरोग्य निरीक्षक प्रवीण धोटे यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांना वाचविण्यास गेलेल्या आरोग्य विभागाचा वाहनचालक नितेश रेवतकर यालाही मुंदाफळे यांनी मारहाण केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर ढोबळे यांनाही शिवीगाळ केली. आरोग्य निरीक्षक प्रवीण धोटे यांनी नरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. नरखेड पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपी सरपंच रूपेश मुंदाफळेविरुद्ध विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला खंडाळा येथील राहत्या घरून अटक केली. पोलिस निरीक्षक जयपालसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय कोलते, कुणाल आरगुडे, मनीष सोनोने, शेषराव राठोड, धनराज भुक्ते पुढील तपास करीत आहे.