गजानन उमाटे, मनीष मासोळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 1 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गट आणि काँग्रेससाठी मोठी धक्कादायक बातमी आहे. ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याच्या निकटवर्तीयाच्या नागपुरातील सूत गिरणीवर आयकर विभागाने धाड मारली आहे. तर काँग्रेसच्या आमदाराच्या धुळ्यातील सूत गिरणीवरही छापेमारी करण्यात आली आहे. काल सकाळपासून सुरू झालेली ही छापेमारी अजूनही सुरू आहे. एकाएका कागदाची छापेमारी सुरू आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाला या धाडीत काय सापडतं? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तुकाराम ऊर्फ बंडू किसन तागडे यांच्या नागपूर येथील मातोश्री मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूत गिरणीवर ही छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाने काल सकाळी 8 वाजता ही धाड टाकली. आजही ही छापेमारी सुरू आहे. गेल्या 24 तासांपासून ही छापेमारी सुरू आहे. नरखेड तालुक्यातील मालापूर (सावरगाव) येथे ही सूत गिरणी आहे. या सूत गिरणीतील प्रत्येक कागद न् कागद तपासला जात आहे. तागडे हे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मालापूर येथील या सूत गिरणीच्या भोवती पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गिरणीतील एकाही कर्मचाऱ्याला घरी सोडण्यात आलेलं नाही. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला आत सोडण्यात येत नाहीये. कागदपत्रांची तपासणी आणि कामगारांची चौकशीही केली जात आहे. तसेच जबाबदार कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे. आकडे जुळवले जात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नागपूरमध्ये ही छापेमारी सुरू असतानाच गेल्या 24 तासांपासून धुळ्यातही छापेमारी सुरू आहे. धुळ्यात काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि आमदार कुणाल पाटील यांच्या सहकारी सूत गिरणीवर धाड मारण्यात आली आहे. काल सकाळी 8 च्या सुमारास पाटील यांच्या गिरणीवर ही छापेमारी करण्यात आली आहे. नागपूर आणि पुणे येथील आयकर विभागाच्या पथकांनी ही छापेमारी केल्याची प्राथमिक माहिती आहे. या छापेमारीमुळे आमदार कुणाल पाटील चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कुणाल पाटील यांच्या सूत गिरणीत रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू आहे. सकाळ झाली तरी ही झाडाझडती सुरूच आहे. आज दिवसभर ही छापेमारी सुरू राहण्याची शक्यता आहे. धुळ्यातील मोराणे येथील जवाहर सहकारी सूत गिरणीमध्ये ही छापेमारी सुरू असून छापेमारीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील पोलिसांच्या सुरक्षेत ही चौकशी सुरू आहे.
दरम्यान, आमदार कुणाल पाटील यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनाही नेमक्या कुठल्या विभागाकडून ही कारवाई केली जात आहे? याची माहिती नाही. कुठल्या विभागाकडून काय कारवाई केली जात आहे? याची माहिती मिळाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देऊ असं कुणाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसने पाटील यांच्यावर जबाबदारी दिल्यानंतरच त्यांच्या सूत गिरणीवर कारवाई सुरू झाल्याने चर्चा रंगली आहे.
काँग्रेस पक्षाने विदर्भातील मतदार संघाची जबाबदारी ही आमदार कुणाल पाटील यांना सोपवली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी यंत्रणांनी छापा टाकत चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. संस्थेचा आर्थिक ताळेबंद तपासण्यात आला असून संस्थेला क दर्जा प्राप्त झाल्याची माहितीही समोर आली आहे.