देशातील पहिला चार स्तरीय वाहतूक कॉरिडोअर तयार; नागपूरमध्ये मोदींच्या हस्ते रविवारी लोकार्पण
डबल-डेकर ओपन वेब गर्डर हा गेल्या हिवाळ्यात गड्डीगोदाम रेल्वे क्रॉसिंगवर ठेवण्यात आला. या मार्गावरील वर्दळ पाहता ही सर्व कामे रेल्वे ब्लॉकच्या वेळेत करण्यात आली.
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी नागपूर मेट्रो फेज-1 च्या उर्वरित मार्गांचे उद्घाटन करणार आहेत. हा भारताच्या मेट्रो रेल्वे बांधकामाच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण असेल. कस्तूरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर (लाइन-1) आणि झाशी राणी स्क्वेअर ते प्रजापती नगर (लाईन-२) हा मेट्रो मार्ग नागपूरच्या जनतेला समर्पित केला जाणार आहे. या नव्या महामार्गामुळे येथील नागरिकांचा प्रवास सुस्साट होणार आहे.
चार-स्तरीय वाहतूक कॉरिडोअरचे उद्घाटन हे एक प्रमुख आकर्षण असणार आहे. हा कॉरिडोअर जमिनीपासून 28 मीटर उंचीवर थेट रेल्वे ट्रॅक ओलांडून 18.9M रुंद स्टील गर्डरमधून तयार झाले आहे. असे अनोखे बहुस्तरीय परिवहन नेटवर्क देशात प्रथमच पाहायला मिळणार आहे.
सद्यस्थितीतील वाहतूक आणि पादचारी भुयारी मार्ग हा सर्वात खालचा स्तर आहे. तर त्याच्यावर असलेला रेल्वे ट्रॅक हा दुसरा स्तर आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो मार्ग अनुक्रमे तिसरा आणि चौथा स्तर तयार करतील. तो एकूण 5.3 किमी असेलल्या आशियातील सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्टचा भाग असणार आहे.
अफकॉन्सने दोन महिन्यांच्या विक्रमी वेळेत 1,650 एमटी वजनाचा हा 80 एम डबल-डेकर स्टील स्पॅन उभारला आहे. गड्डीगोदाम रेल्वे क्रॉसिंगवर जिथून दररोज 150 हून अधिक रेल्वे आणि एक लाखाहून अधिक वाहने जातात. त्यावरती स्टील सुपरस्ट्रकचर ठेवण्यात आले. अवाढव्य 18.9एम रुंद गर्डरचे लाँचिंग ही भारतीय रेल्वेतील बहुधा पहिलीच घटना आहे.
डबल-डेकर ओपन वेब गर्डर हा गेल्या हिवाळ्यात गड्डीगोदाम रेल्वे क्रॉसिंगवर ठेवण्यात आला. या मार्गावरील वर्दळ पाहता ही सर्व कामे रेल्वे ब्लॉकच्या वेळेत करण्यात आली. स्पॅन जमिनीपासून 28 मीटर उंचीवर आहे. इतकं आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या कामाचा भारतात यापूर्वी कधीही प्रयत्न झाला नव्हता, असे अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक अरुण कुमार म्हणाले.
अफकॉन्सने आधीच रीच-3 येथे काम वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा एक आदर्श प्रस्थापित केल्यामुळे, महा मेट्रोने टीमला पाच महिन्यांऐवजी दोन महिन्यांत काम पूर्ण करण्यास सांगितले तेव्हा आश्चर्य वाटले नाही. एक मजबूत टीम तयार करण्यात आली. सर्व गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांचे पालन करून दोन महिन्यांत नाविन्यपूर्णपणे काम पूर्ण केले. अल्पावधीत अनेक विक्रमही झाले.
आयुष्यात एकदाच येणारे हे आव्हान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. साइट आणि मुख्य कार्यालयातील आमच्या सहकाऱ्यांव्यतिरिक्त, आम्ही आमच्या तयारीचे गंभीरपणे पुनरावलोकन करण्यासाठी आमच्या चेनाब रेल्वे ब्रिज प्रकल्पाकडून तज्ज्ञांची मदत घेतली. मनुष्यबळ आणि यंत्रे अभूतपूर्व वेगाने एकत्रित करण्यात आली, असे प्रकल्प नियंत्रक अमरसिंह राऊत यांनी सांगितले.
नागपूर मेट्रोच्या फेज-1 मध्ये 39 किलोमीटर एलिव्हेटेड कॉरिडोअरचा समावेश आहे. अफकॉन्सने 17.1 किलोमीटर बांधले आहे आणि एकूण सिव्हिल कामाच्या जवळपास 51% आहे. सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्ट व्यतिरिक्त, अफकॉन्सने रीच-2 आणि रीच-1 मध्ये आठ स्थानके आणि दोन डेपो देखील बांधले आहेत. अफकॉन्सने बांधलेले सीताबुलडी इंटरचेंज स्टेशन हे भारतातील सर्वात उंच मेट्रो इंटरचेंज स्टेशन आहे.
ठळक वैशिष्ट्ये
- अफकॉन्सने नागपुरात आशियातील सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्ट बांधला आहे.
- पहिला स्तर राष्ट्रीय महामार्गासाठी तर दुसरा स्तर मेट्रोसाठी असेल
- चार-स्तरीय वाहतूक कॉरिडॉर गड्डीगोदाम क्रॉसिंग येथे आहे
- यामध्ये वाहन आणि पादचारी भुयारी मार्ग, रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो यांचा समावेश असेल.
- ही अनोखी व्यवस्था 5.3 किमी मेट्रो-कम-राष्ट्रीय महामार्ग डबल-डेकर व्हायाडक्टचा भाग आहे.
- भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच 18.9 मीटर रुंद स्टील गर्डरचे 28 मीटर उंचीवर थेट रेल्वे रुळांवर लाँचिंग करण्यात आले आहे.