Kolhapur North By Election 2022 : चंद्रकांत पाटलांना हिमालयात पाठवायचंय, कोल्हापूर उत्तरच्या निकालावर नाना पटोलेंनी दादांना डिवचलं
उत्तर कोल्हापुरात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) या आघाडीवर आहेत. हा राज्याला दिशा देणारा निकाल, असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नागपुरात ते बोलत होते. महाविकास आघाडीनं केलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचं ते म्हणाले.
नागपूर : उत्तर कोल्हापूरच्या ( North Kolhapur) पोटनिवडणुकीत नवव्या फेरीअखेर काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) आघाडीवर आहेत. 36 हजारांवर मतांनी जाधव आघाडीवर आहेत. त्यामुळं उत्तर कोल्हापूरच्या जनतेला धन्यवाद. महाराष्ट्रंच नाही तर देशाला दिशा देणारा हा निकाल असेल, असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केलंय. केंद्र सरकारचं अपयश लपवून केलेला प्रचार या निवडणुकीत होता. महाविकास आघाडी कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना हिमालयात पाठवायचं आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापूरवरुन आधीच पलायन केलंय, असंही नाना पटोले म्हणाले. चंद्रकांत दादा पाटील यांना कोल्हापूरकरांनी नाकारलं. भाजपची अमानत रक्कम जप्त व्हावी अशा निकालाची आशा होती. कोरोनात राज्य सरकारने केलेल्या कामामुळे आम्हाला पाठिंबा मिळाला, असंही त्यांनी सांगितलं.
राम मंदिरासाठीचा पैसा गेला कुठे?
कोल्हापूरच्या निकालात मुख्यमंत्र्यांची मोठी भूमिका होती. पंतप्रधान महाराष्ट्रावर टीका करतात. भाजप खालच्या पातळीवर गेलीय. भोंगा आता फक्त महागाई, बेरोजगारीवर वाजायला हवा, असंही पटोले यांनी सांगितलं. धर्माच्या नावाने राजकारण होऊ शकत नाही. विक्रांतसाठी पैसे गोळा केले ते कधी सांगतात पक्षाला दिले, कधी सांगतात राज्यपाल कार्यालयात दिले. त्यावरून दिशाभूल होतेय. धर्मांच्या ठेकेदारांकडून धर्माचं बाजारीकरण होतेय. राम मंदिरासाठी गोळा केलेले पैसे कुठे गेलेय? अशी जनता विचारतेय, असा सवालही नाना पटोले यांनी केलाय.
वेगळा बाऊ करण्याची गरज काय?
आज हनुमान जयंती आहे. राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाचला. त्यात वेगळं काय त्यात, आम्ही पण करणार आहोत. ज्याच्या त्याच्या धर्माची पूजा करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यासाठी वेगळा बाऊ करण्याची गरज काय? बाजारीकरण करण्याची गरज?, असा प्रश्नही नाना पटोले यांनी विचारला. भोंग्याच्या वादात काँग्रेसला पडायचे नाही. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. केंद्र सरकारने देशाला 50 वर्षे मागे नेलं, बर्बाद केलं. आता जे कोळसा संकट आलंय ते केंद्र सरकारमुळे, असं सांगायलाही नाना पटोले विसरले नाहीत. केंद्र सरकारला बेरोजगारी वाढवायची आहे. आम्ही रोज हनुमान चालीसा पठण करतो. पण याचं बाजारीकरण करत नाही. धर्माचे ठेकेदार बाजारीकरण करतायत, अशी टीका त्यांनी केली.