नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मनसे कार्यकर्त्यांनी दादरमध्ये बॅनरबाजी केली आहे. या बॅनर्सवर राज ठाकरे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले. त्यांना शुभेच्छा. आता त्यांच्याकडे एकच आमदार आहे. हा आकडा 50 पर्यॅत न्यावा लागेल. नुसत्या नकला काढून होणार नाही, असा चिमटा जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना काढला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टोलेबाजी केली.
शिंदे गटाच्या कालच्या जाहिरातीतून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब होता. त्यावरूनही जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटाला टोले लगावले. आजची जाहिरात सरड्याच्या रंगासारखी आहे. आज उद्या ते पंतप्रधान व्हायची इच्छा असल्याचंही बोलतील. आजच्या जाहिरातीतील सर्वेत बदल झाला नाही ना? 24 तासांत सर्वेही बदल करतील ते महान आहेत. या जाहिरातीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना कळलं असेल. मुख्यमंत्री फार घाईत असतात. मातेश्रीवर असताना त्यांनी सर्वांचे पत्ते साफ केले होते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जाहिरातींवर दोन दिवसांत 10 कोटींची खर्च झाला आहे. एवढे पैसे आणतात कुठून? ज्यांनी बोटाला धरुन त्यांना या पदावर बसवलं, त्यांची ही अवेहलना आहे. विधानसभेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांना सांभाळून घेतात. त्यांना अशी वागणूक देणार असाल तर ठेच पोहोचते. काहीही म्हटलं तरी फडणवीस मोठे नेते आहेत, असं सांगतानाच 40 आमदारांचं काय प्रेशर आहे, हे मंत्रालयातील सचिवांना विचारा. ते कुणाच्या बदल्या मागतात हे पाहा, असंही ते म्हणाले.
आनंद दिघेंचा मृत्यू एका कारणाने झाला. भावनिक खेळ बंद करा. ठाण्यात दिघेंचं नाव चालतं, त्यामुळे हे आरोप होत असतात. मिनाक्षी शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनीच महापौर केलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
अब्दूल सत्तार धीट आहेत. ते कुणाच्या बापाचं ऐकत नाही. ते राजीनामा देणार नाही, असं एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले. मुख्यमंत्री हे राक्षसी महत्त्वाकांशा असलेले आहेत. मी किती मोठा आहे हे ते कायमचं दाखवत असतात, अशी टीका त्यांनी केली.